India vs Pakistan Operation Sindoor Latest Updates: जम्मूमधील सांबा सेक्टरमधून काल रात्री भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सात दहशतवादी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कारवाईत ठार झाले आहेत. याबाबत बीएसएफने एका निवेदनाद्वारे माहिती दिली आहे. या कारवाईदरम्यान, बीएसएफने पाकिस्तानी रेंजर्सच्या सीमा चौकीचे मोठे नुकसान केले, जिथून या दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी जोरदार गोळीबार करण्यात येत होता.
“जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये, ८ आणि ९ मे २०२५ च्या मध्यरात्री, दहशतवाद्यांच्या एका गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. या दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानी रेंजर्सच्या चौकीतून गोळीबार करण्यात आला. परंतु बीएसएफच्या सतर्क जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न निष्फळ ठरवत किमान ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानी रेंजर्स पोस्टचे मोठे नुकसान केले,” असे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले.
तत्पूर्वी काल रात्री, पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर विविध ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सडेतोड उत्तर दिले. या कारवाईत एल-७० तोफा, झेयू-२३एमएम, शिल्का प्रणाली आणि इतर प्रगत काउंटर-यूएएस उपकरणांचा मोठ्या प्रमाणत वापर करण्यात आला. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र विमानांनी जम्मू काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंतच्या शहरांमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे धाडस केले परंतु त्यापैकी कोणत्याही ठिकाणी त्यांना यश मिळाले नाही. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्या सर्वांना हाणून पाडले आहे. पाकिस्तानने संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे, ज्याला भारतीय सैन्य योग्य उत्तर देत आहे.
ऑपरेशन सिंदूर
ऑपरेशन सिंदूरचा एक भाग म्हणून, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदसह दहशतवाद्यांच्या ९ प्रशिक्षण केंद्रांवर आणि तळांवर नुकतेच हल्ले केले होते. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून दहशतवादी छावण्यांवर भारताने हे हल्ले केले होते. दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता.