BSP chief Mayawati Akash Anand : बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांची पक्षाच्या समन्वयक (कोऑर्डिनेटर) पदावरून हकालपट्टी केली आहे. मायावती यांनी आकाश यांचं नाव त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं होतं. तसेच त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरही आकाश आनंद यांची नेमणूक केली होती. मात्र, आता आकाश यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. मायावती यांनी राज्यसभा खासदार रामजी गौतम यांच्यावरील जबाबदारी वाढवली आहे. मायावती यांनी रामजी गौतम यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावर नेमणूक केली आहे. यापूर्वी मायावती यांनी आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्याकडील पक्षाच्या जबाबदाऱ्या काढून घेतल्या होत्या. बसपा प्रमुख मायावती यांनी आज पक्षाची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत हे निर्णय जाहीर केले. दरम्यान, आता मायावती यांचा उत्तराधिकारी कोण असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, मायावती यांनी यावरही पक्षाच्या बैठकीत उत्तर दिलं. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा कोणीही उत्तराधिकारी नसेल असं त्यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, यावेळी मायावती यांनी सांगितलं की त्यांचे बंधू आनंद यांच्या मुलांची लग्नं राजकीय कुटुंबांमध्ये होणार नाहीत. याचं कारण विचारल्यावर त्या म्हणाल्या, “आनंद कुमार यांच्याबद्दल मी थोडी माहिती देऊ इच्छिते की सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत पक्ष व चळवळीच्या हितासाठी त्यांनी त्यांच्या मुलांची लग्नं बिगर राजकीय कुटुंबांमध्ये लावून देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून अशोक सिद्धार्थ यांच्याप्रमाणे भविष्यात कोणीही आपल्या पक्षाचं नुकसान करू शकणार नाही”.

बहुजन समाज पार्टीने एक निवेदन जारी केलं आहे. त्यामध्ये मायावती यांनी म्हटलं आहे की “मी स्वतः देखील काही निर्णय घेतले आहेत. माझ्या हयातीत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत पक्षात माझा कोणीही वारसदार नसेल. पक्षातील माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या या निर्णयाचं मनापासून स्वागत केलं आहे”.

बसपा माझ्यासाठी कुटुंबापेक्षा मोठी व महत्त्वाची : मायावती

मायावती म्हणाल्या, माझ्यासाठी बहुजन समाज पार्टी कुटुंबापेक्षा मोठी व महत्त्वाची आहे. भाऊ, बहीण, त्यांची मुलं व इतर नातेवाईकांपेक्षा माझ्यासाठी मला माझा पक्ष जवळचा आहे. त्यांचं हे म्हणणं पक्षातील सहकाऱ्यांना पटवून देण्यासाठी त्या म्हणाल्या, मी जोवर जिवंत आहे, माझा श्वास चालू आहे तोवर पूर्ण इमानदारीने मी केवळ पक्षासाठी काम करेन. पक्ष वाढवण्यासाठी कष्ट करेन. पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करेन.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ हे मायावतींच्या नावाचा दुरुपयोग करत होते, स्वतःच्या खासगी लाभांसाठी मायावतींच्या नावाचा वापर करत होते, त्यामुळे मायावतींनी ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जात आहे.