बहुजन समाज पार्टी म्हणजेच बीएसपीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी लखनऊमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीदरम्यान त्यांनी पक्षाच्या नेत्यांसाठी काही निर्देश जारी केले आहेत. बसपाच्या सर्वेसर्वा असणाऱ्या मायावती यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त थेट पक्षासाठी निधी द्यावा अशी मागणी केली आहे. पक्षाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी भेटवस्तूंऐवजी थेट पैसे द्यावेत असं मायवती यांनी सांगितलं आहे. महागड्या भेटवस्तू मला देऊ नका असंही मायावती यांनी म्हटलं आहे. मला महागड्या भेटवस्तू देण्याऐवजी पक्ष हिताचा विचार करुन थेट आर्थिक स्वरुपात पक्षाला मदत करणं अधिक योग्य ठरेल असं मायावतींनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

शनिवारी सकाळी बसपाच्या अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशमधील सर्वच पदाधिकारी, सेक्टर प्रभारी आणि विधानसभा क्षेत्रांमधील पक्षाच्या अध्यक्षांबरोबरच सर्व झोन स्तरावरील समन्वयकही उपस्थित होते. या वेळी मायावती यांनी स्थानिक स्वराज संस्थांमधील निवडणुकीबरोबरच २०२४ च्या निवडणुकीबद्दलही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. याच निवडणुकांसाठी पक्षाला निधीची गरज असून त्यासाठीच आपल्या वाढदिवसाच्या दिवशी भेटवस्तू देण्याऐवजी पक्षनिधी म्हणून रक्कम पक्षाला द्यावी असं मायावतींनी म्हटलं आहे.

पक्षाच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये मायावती यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर टीका केली. भारतीय जनता पार्टी बेरोजगारी, गरीबी, महागाईसारख्या प्रश्नांवरुन लोकांचं लक्ष विचलित करु पाहत आहे. यासाठी त्या वेगवेगळ्या गोष्टी करत असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. देशामध्ये सामाजिक स्तरावर हिंसाचार आणि तणावाचा नकारात्मक प्रभाव पडत आहे. महिलांच्या विरोधात अत्याचाराचं प्रमाण आणि गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढल्याने असुरक्षित वातावरण तयार झालं आहे, असंही माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. बेरोजगारीमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने तुरुंगातील कैद्यांची संख्या वाढल्याचंही मायावती यांनी नमूद केलं आहे. त्यांनी कैद्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मायवती यांनी आपण वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचं सांगितलं आहे. मायवती यांचा वाढदिवस १५ जानेवारीला असतो. यंदाच्या वाढदिवसाला पक्षाला आर्थिक मदत करा असं आवाहन त्यांनी केलं आहे. गरिबांना मदत करुन माझा वाढदिवस ‘जन कल्याणकारी दिवस’ म्हणून साजरा करा असंही त्यांनी म्हटलं आहे.