Bengaluru Dermatologist Doctor Murder: बंगळुरूमध्ये डॉक्टर पतीनं आपल्या डॉक्टर पत्नीला थंड डोक्यानं संपविल्यानंतर एकच खळबळ उडाली. सासऱ्यांनी हॉस्पिटल बांधण्यासाठी आर्थिक मदत केली नाही म्हणून डॉ. महेंद्र रेड्डी नामक पतीनं त्याची पत्नी डॉ. कृतिका रेड्डीला भूल देण्याच्या इंजेक्शन देऊन संपवलं. पत्नीच्या मृत्यूला सहा महिने झाल्यानंतर या गुन्ह्याचा छडा लागला. डॉ. कृतिका रेड्डीच्या वडिलांनी मुलीच्या लग्नानंतर तिच्यासाठी तीन कोटींचे घर बांधले होते. मात्र आता मुलीचा असा शेवट पाहून त्यांनी हे घर इस्कॉनला दान केले आहे.
बंगळुरूच्या मुन्नेकोलाल परिसरातील अय्यप्पा लेआऊटमध्ये या घराच्या बाहेर आता ‘इन मेमरी ऑफ डॉ. कृतिका एम. रेड्डी’ असा फलक लागला आहे. १,५०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेल्या या बंगल्याची बाजारभावानुसार ३ कोटी रुपये किंमत आहे.
डॉ. कृतिकाच्या वडिलांनी सांगितले, “माझी मुलगी तिचा पती आणि मुलांसह आनंदात राहावी, यासाठी मी हे घर बांधल होते. मात्र आता तीच उरली नाही. त्यामुळे हे घर मी इस्कॉनला दिले आहे.” त्वचारोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. कृतिका यांचा विवाह डॉ. महेंद्र रेड्डी याच्याशी मे २०२४ मध्ये झाला होता. लग्नानंतर ते या घरात शिफ्ट झाले होते. या वर्षी एप्रिल महिन्यात तिच्या पतीने तिच्यावर उपचार केल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता.
डॉ. कृतिकाच्या मृत्यूच्या सहा महिन्यानंतर कृतिकाची बहीण निकीताला मृत्यूचे कारण शोधण्यात यश आले. फॉरेन्सिक अवहालात असे आढळून आले की, तिला प्रोपोफोल या औषधाची जादा मात्रा देण्यात आली होती. हे औषध रुग्णालयात शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्यासाठी वापरले जाते. डॉ. महेंद्र रेड्डी हे सर्जन असल्यामुळे त्यांच्याकडे सर्वात प्रथम संशयाची सुई गेली. या गुन्ह्यात त्यांना आता अटकही झाली आहे.
डॉ. कृतिकाचे वडील मुनी रेड्डी यांनी म्हटले की, मी दोन्ही मुलींसाठी दोन घरे बांधली होती. जेणेकरून लग्नानंतर त्या त्यांच्या कुटुंबाबरोबर आनंदात राहतील. मात्र कृतिकाच्या मृत्यूनंतर आता माझी त्या घरात जाण्याची हिंमत होत नाही. “तिच्या आठवणी माझा पाठलाग करतात. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी हे घर मी इस्कॉनला दान केले. त्यांच्याकडून इथे आध्यात्मिक कार्यक्रम घेतले जातात. मला वाटते माझी मुलगी मृत्यूनंतरही या कार्यक्रमाचा भाग होईल.”
“कृतिकाच्या मृत्यूनंतरही ती याच घरात राहते, असे मला सतत वाटते. वडील म्हणून मला आता इथे राहणे शक्य नाही. तिच्या बालपणीच्या आठवणी आठवून मला उचंबळून येते”, असेही मुनी रेड्डी यांनी सांगितले.
मुलीला मारण्यापेक्षा त्याने घटस्फोट द्यायला हवा होता
मुनी रेड्डी म्हणाले, आम्ही लग्नापूर्वी महेंद्र रेड्डीची पार्श्वभूमी तपासली होती. कृतिका आणि महेंद्र यांच्यात लग्नानंतर थोड्याबहुत अडचणी होत्या. पण प्रत्येक जोडप्यात काही ना काही अडचणी येतातच. कृतिका एक चांगली विद्यार्थी आणि प्रोफेशनल डॉक्टर होती. जर महेंद्रला काही अडचण होती तर त्याने तिचा खून करण्याऐवजी घटस्फोट देऊन बाजूला व्हायला हवे होते.
२१ एप्रिल २०२५ ला नेमकं काय घडलं?
मुनी रेड्डी पुढे म्हणाले, “२१ एप्रिल २०२५ ला कृतिकाला गॅसेसचा त्रास होतो आहे असे सांगत महेंद्रने इंजेक्शन दिले. त्यानंतर तो तिला रुग्णालयात घेऊन गेला. पण त्याने तिला सीपीआर दिला नाही. तिला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी म्हटले की, डॉ. महेंद्र हा सगळा प्रकार नैसर्गिक मृत्यूचा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. पण व्हिसेरा रिपोर्ट आला आणि डॉक्टर महेंद्रचे पितळ उघडे पडले. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली.”