जैसलमेर : जैसलमेरहून जोधपूरला जाणाऱ्या एका खासगी बसला मंगळवारी आग लागल्याने २० प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १६ जण गंभीर जखमी झाले. ५७ प्रवाशांना घेऊन ही बस दुपारी जैसलमेरहून निघाली. जैसलमेर-जोधपूर महामार्गावर वाहनातून धूर येऊ चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र काही क्षणातच वाहनाने पेट घेतला.
स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यास सुरुवात केली. लष्कराच्या जवानांनीही या कामात मदत केली. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळविले. जखमी प्रवाशांना जैसलमेरमधील जवाहर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा जैसलमेरला पोहोचले आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दुर्घटनेतील जखमींना तातडीने उपचार मिळावे, असे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.