प्रगत आणि शिक्षित समाजातही हुंड्यासारख्या कुप्रथा अजूनही सुरू असल्याची उदाहरणे अनेकदा पाहायला मिळतात. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेत आले होते. अशाच प्रकारची प्रकरणे अनेक ठिकाणी घडली होती. त्यानंतर आता कानपूरमधील एका सिमेंट व्यावसायिकाच्या २५ वर्षांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत पत्नीच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि त्यातून तिचा खून झाल्याचा आरोप केला आहे.
मुळची दिल्लीची रहिवासी असलेल्या निकिताचा डिसेंबर २०२२ मध्ये पार्थ महानाशी लग्न केले होते. या जोडप्याचे उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये एक घर होते. या घरी १८ ऑक्टोबर रोजी निकिता मृतावस्थेत आढळली.
मृत निकिताची बहीण मुस्कानने दिलेल्या माहितीनुसार, निकिता आणि पार्थ लखनौत आले होते. तिथे ते दोघे पार्टीत सहभागी झाले होते. रात्री उशीरा घरी परतल्यानंतर पार्थने मुस्कानला फोन करून सांगितले की, त्याचे आणि निकिताचे भांडण झाले आहे. यामुळे मुस्कानने त्याला व्हिडीओ कॉल करण्याची विनंती केली.
“पार्थने जेव्हा व्हिडीओ कॉल केला तेव्हा निकिता फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. मी त्याला विनंती केली की, निकिताला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल कर. पण तो माझी दिशाभूल करत राहिला”, अशी माहिती मुस्कानने दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थच्या मावशीला निकिताच्या आईने फोन केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची माहिती कळली आणि कुटुंबाला धक्काच बसला.
भाजपा नेत्याचा उल्लेख करत आरोप
निकिताच्या आईने मुलीची हत्या केल्याचा आरोप सासरच्या लोकांवर केला आहे. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते सतीश महाना यांनी पार्थच्या कुटुंबाला संरक्षण दिल्याचाही आरोप ते करत आहेत. या आरोपवर अद्याप पतीचे कुटुंब किंवा महाना यांच्याकडून खुलासा आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात अद्याप कोणतीही पोलीस कारवाई झालेली नाही. पार्थ मादक पदार्थांचे सेवन करत असून तो सतत भांडण करत असल्याचा आरोप निकिताच्या कुटुंबियांनी केला आहे.
अखेर निकिताच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर पार्थ आणि सासरच्या लोकांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.