Bengaluru : देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी दररोज अनेक क्राईमच्या घटना घडल्याची माहिती समोर येते. खरं तर गुन्हेगारीच्या घटना कमी करण्यासाठी सातत्याने पावलं उचलली जातात. मात्र, तरीही क्राईमच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. दरोडे, मारहाण, संपत्तीचा वाद, घरगुती हिंसाचार किंवा कधी किरकोळ वादातून थेट खून झाल्याच्या घटना देखील घडतात.

आता अशाच प्रकारची एक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. बंगळुरूच्या मागाडी रोडवरील एका बस स्टँडजवळ एका कॅब ड्रायव्हरने त्याच्या पत्नीची तब्बल ११ वेळा चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

या घटनेत पीडित महिलेचं नाव रेखा असं असून ती हसनमधील चन्नरायपटना येथील रहिवाशी आहे. तिचं तुमाकुरु जिल्ह्यातील सिरा येथील लोहिताश्व याच्याशी लग्न झालं होतं. त्यानंतर हे जोडपे बंगळुरूत राहत होतं. त्यांना दोन मुली आहेत. तसेच रेखा ही एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तिच्याच ऑफिसमध्ये तिने पतीची नोकरीसाठी शिफारस केली होती. त्यानंतर त्याच ऑफिसमध्ये तो कॅब ड्रायव्हर म्हणून काम करू लागला.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रेखा आणि तिची मोठी मुलगी रस्ता ओलांडण्यासाठी थांबले होते. यावेळी असताना त्या ठिकाणी पती लोहितश्वा अचानक समोर आला आणि दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर लोहितश्वाने पत्नीला शिवीगाळ केली आणि नंतर चाकूने तिच्यावर तब्बल ११ वेळा वार केले. यावेळी मुलीने तिच्या वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा हा प्रयत्न व्यर्थ ठरला.

जेव्हा आजूबाजूचे लोक मदतीसाठी आले, तोपर्यंत पती घटनास्थळावरून फरार झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत त्या महिलेला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, तिचा उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या शरीरावर चाकूच्या किमान ११ जखमा आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या संपूर्ण घटनेचा पोलीस तपास करत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

या घटनेबाबत घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्या महिलेच्या मुलीने पोलिसांना सांगितलं की तिला फक्त एवढंच माहित होतं की लोहितश्वा आणि रेखा या दोघांचे नियमितपणे कोणत्या न कोणत्या कारणावरून भांडण होत असे. दरम्यान, ती अल्पवयीन असल्याने तिला समुपदेशनासाठी दाखल करण्यात आलं असून या प्रकरणात ती एक महत्त्वाची प्रत्यक्षदर्शी आहे आणि तिचे जबाब महत्त्वाचे असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.