आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (८ मार्च) केंद्र सरकारने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारी ३०० रुपयांची प्रतीसिलिंडर सूट पुढील एक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे. या अनुदानाची मुदत मार्च २०२४ पर्यंत होती, मात्र आता त्यात वाढ करून मार्च २०२५ अशी एक वर्षाची वाढ केली आहे. दहा कोटीहून अधिक कुटुंबांना याचा लाभ मिळले, असे कॅबिनेट मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

याशिवाय केंद्र सरकारचे कर्मचारी (Dearness Allowance) आणि पेन्शन धारकांच्या (Dearness Relief) महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जानेवारी २०२४ पासून पूर्व लक्ष्यीप्रभावाने लागू केला जाईल. ही वाढ केल्यामुळे आता ४६ टक्के असलेला महगाई भत्ता वाढून ५० टक्के झाला आहे.

ऑक्टोबर २०२३ मध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती. त्यावेळीही चार टक्क्यांची वाढ केल्यामुळे महागाई भत्ता ४६ टक्क्यांवर पोहोचला होता. कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे सरकारी तिजोरीवर एकत्रितपणे १२ हजार ८६८.७२ कोटींचा बोजा पडणार आहे. ४९.१८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६७.९५ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींनुसार ही वाढ करण्यात आली आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजना अंतर्गत आता मार्च २०२५ पर्यंत लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर ३०० रुपयांची सूट दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ १० कोटी कुटुंबाना होणार असल्याचे पियुष गोयल यांनी सांगितले. तर या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर १२ हजार कोटींचा भार पडणार आहे.