बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी धर्म संसदेमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर आपली प्रतिक्रिया दिलीय. “जे लोक मुस्लिमांच्या नरसंहाराचं आवाहन करत आहेत ते लोक खरं तर देशामधील गृहयुद्धाचं आवाहन करत आहेत,” अशी टीका शाह यांनी केलीय.

‘द वायर’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये शाह यांनी वरिष्ठ पत्रकार करण थापर यांच्याशी चर्चा करताना, सध्या जे काही सुरु आहे ते पाहून धक्का बसतो असंही म्हटलंय. वादग्रस्त विधानं करणारे नक्की काय बोलत आहेत याचा त्यांना अंदाजही नसावा असंही शाह म्हणाले आहेत. ते लोक ज्या प्रकारचं आवाहन करत आहे ते एखाद्या गृहयुद्धाप्रमाणे आहे, अशी टीका शाह यांनी मुलाखतीमध्ये केलीय.

२० कोटी लोकसंख्येला तुम्ही अशाप्रकारे संपवण्याचं वक्तव्य करु शकत नाही, असं म्हणत नसीरुद्दीन शाह यांनी आपला संताप व्यक्त केला. पुढे बोलताना शाह यांनी अशाप्रकारच्या वक्तव्यांविरोधात लोक लढण्यासाठी मुस्लीम तयार आहेत, असाही विश्वास व्यक्त केलाय.

नक्की वाचा >> नसीरुद्दीन शाहांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा; म्हणाले, “ते स्वत:च्या धार्मिक श्रद्धा जपतील पण मुस्लिमांविरोधात…”

मुस्लीम अशा वक्तव्यांविरोधात लढण्यास तयार आहेत कारण आम्ही सर्वजण इथलेच आहोत. आमच्या पिढान् पिढ्या इथेच राहिल्यात आणि इथेच मरण पावल्यात, असं शाह म्हणाले. जे लोक अशाप्रकारची वादग्रस्त आणि भावना भडवणारी वक्तव्य करत आहेत ते लोक नक्की काय बोलतायत त्यांचा त्यांना अंदाज नसेल, असा टोलाही शाह यांनी लगावलाय.

नक्की वाचा >> “मला देशात असुरक्षित वाटत नाही कारण हे माझं घर आहे, पण…”; नसीरुद्दीन शाहांनी व्यक्त केली चिंता

अशाप्रकारच्या वक्तव्यांविरोधात कोणत्याही प्रकारचं आंदोलन सुरु झालं तर त्याने मोठं नुकसान होईल, असं आपल्याला वाटत असल्याचंही शाह यांनी म्हटलंय.