campaigning for 1st phase of gujarat election over voting tomorrow zws 70 | Loksatta

पहिल्या टप्प्यातील प्रचार समाप्त, उद्या मतदान; ८९ जागांसाठी ७८८ उमेदवार रिंगणात

या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांत ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवींचा समावेश आहे

पहिल्या टप्प्यातील प्रचार समाप्त, उद्या मतदान; ८९ जागांसाठी ७८८ उमेदवार रिंगणात
photo source :(PTI Photo)

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीतील १ डिसेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी पाच वाजता संपला. दक्षिण गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र विभागातील १९ जिल्ह्यांतील ८९ जागांसाठी तब्बल ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यासाठी गुरुवारी मतदान होणार आहे.

गुजरातमध्ये आतापर्यंत भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढत होत असे. परंतु यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आप) रूपाने तिसरा पक्ष रिंगणात आहे. ‘आप’ने एकूण १८२ पैकी १८१ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांत ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवींचा समावेश आहे. ते द्वारका जिल्ह्यातील खंभालिया येथून निवडणूक लढवत आहेत. गुजरातचे माजी मंत्री पुरुषोत्तम सोलंकी, सहावेळा आमदारपदी निवडून गेलेले कुंवरजी बावलिया, मोरबीचे कांतीलाल अमृतिया, क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा आणि ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया हेही रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यासाठी भाजपच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी भाजप नेत्यांनी या टप्प्यात अनेक सभांना संबोधित केले. पहिल्या टप्प्यात भाजप व काँग्रेसने प्रत्येकी ८९ उमेदवार उभे केले आहेत. ‘आप’चे ८८ उमेदवार रिंगणात आहेत. सुरत (पूर्व) मतदारसंघातील ‘आप’च्या उमेदवाराने शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पहिल्या टप्प्यात भाजपने नऊ, काँग्रेसने सहा आणि आपने पाच महिला उमेदवार उभ्या केल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील एकूण ७८८ उमेदवारांपैकी ७१८ पुरुष आणि ७० महिला उमेदवार आहेत. मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाने पहिल्या टप्प्यात ५७, भारतीय आदिवासी पक्षाने (बीटीपी) १४, समाजवादी पक्षाने १२, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्‍सवादी) चार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दोन उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय ३३९ अपक्षही रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या भागात एकूण दोन कोटी ३९ लाख ७६ हजार ६७० मतदारांची नोंदणी झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 03:51 IST
Next Story
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’ चाचणीस न्यायालयाची परवानगी; हल्ला झाल्याने बंदोबस्तात वाढ