करोना महामारीमुळे जगभरात मोठं आव्हानात्मक वातावरण निर्माण झालं आहे. संपूर्ण जग गेल्या दीड वर्षापासून या विषाणूच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच याबाबत आता एक आश्चर्यकारक दावा समोर आला आहे. या दाव्यात असं म्हटलं गेलं की, ‘करोना (Sars-Cov-2)हा विषाणू (Virus) नव्हे तर एक जिवाणू (Bacteria) आहे. त्यामुळे, करोनाग्रस्त असलेले रुग्ण फक्त सौम्य एस्पिरिनने बरे होऊ शकतात.’ आता हा दावा वाचल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. कारण, सुरुवातीपासूनच करोना हा विषाणूच असल्याचं सांगण्यात आलं आहे. मग, इतक्या काळानंतर तो विषाणू नसून जिवाणू असल्याचा दावा का?असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. याच पार्श्वभूमीवर, आता हा दावा कसा पूर्णपणे चुकीचा आणि तथ्यहीन आहे हे थेट केंद्र सरकारकडूनच स्पष्ट करण्यात आलं आहे.

करोना विषाणू कि जिवाणू? आणि तो अँस्पिरिनने बरा होतो का? याबाबत केंद्र सरकारने फॅक्ट चेक केलं आहे. पीआयबी अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोची फॅक्ट चेक शाखा आहे. ही शाखा अशा प्रकारचे बनावट, खोट्या मेसेजेस आणि माहितीची चौकशी करते. त्यामधील, चुकीचे दावे नाकारते आणि सत्य सांगते. करोना विषाणू आहे कि जिवाणू याबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या या मेसेजबद्दलही पीआयबीने नेमकं सत्य सांगितलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकने याबाबत एक ट्विट केलं आहे.

सरकारचं फॅक्ट चेक

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “एका फॉर्वर्डेड व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की करोना हा विषाणू नसून बॅक्टेरिया आहे आणि एस्पिरिनसारख्या अँटीकोआगुलंट्सने (Anticoagulants) बरा होऊ शकतो. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. करोना हा एक विषाणूच आहे, तो जीवाणू नाही. त्याचप्रमाणे, करोना हा एस्पिरिनसारख्या अँटीकोआगुलंट्सने (Anticoagulants) बरा होऊ शकत नाही.” तर अशा प्रकारे सरकारने आता हा दावा पूर्णपणे खोडून काढला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयापासून ते अगदी अमेरिकन आरोग्य संस्था सीडीसी, ब्रिटिश आरोग्य संस्था एनएचएस आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) या सर्वांनीच करोना हा विषाणू असल्याचं यापूर्वीच स्पष्टपणे सांगितलं आहे. मात्र, तरीसुद्धा आता याबाबत संभ्रम निर्माण करणारी माहिती आणि मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारत, अमेरिका, यूके, रशियासह अनेक देशांमध्ये करोना प्रतिबंधक लसही बनवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, भारतातील मोठ्या लोकसंख्येने ही लस घेतली आहे. अशा परिस्थितीत या व्हायरल मेसेजमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं आता सरकारकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलं आहे.