कॅनडाच्या संसदेत नाझी सैनिकाचा गौरव झाल्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर सडकून टीका झाली. यानंतर थेट कॅनडाच्या संसदेचे अध्यक्ष अँथनी रोटा यांना माफी मागावी लागली. मात्र, त्यांच्या माफीनंतरही प्रकरण मिटलं नाही. त्यामुळे अखेर संसदेचे अध्यक्ष अँथनी रोटा यांनी पक्षातील नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान ट्रुडो यांच्या सांगण्यावरून आपल्या पदाचा राजीनामा दिला.

अँथनी रोटा संसदेत राजीनामा देताना म्हणाले, “माझ्याकडून घडलेल्या चुकीबद्दल मला खेद आहे. त्यामुळे मी संसदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे. ९८ वर्षीय यारोस्लेव्ह हुंका यांचा नाझी सैन्याशी संबंध आहे हे मला माहिती नव्हतं. त्यामुळे मी चुकीने त्यांना संसदेतील कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं.”

ट्रुडो यांनीही संसदेत जे घडलं ते खूप अस्वस्थ करणारं आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच यामुळे कॅनडाच्या संसदेची आणि सर्व कॅनडाच्या नागरिकांची मान शरमेने झुकली, असंही ट्रुडोंनी नमूद केलं.

नेमकं काय घडलं?

रविवारी (२४ सप्टेंबर) कॅनडाच्या संसदेत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गेल्या आठवड्याभरापासून झेलेन्स्की कॅनडाच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दुसऱ्या महायुद्धात नाझी फौजांच्या बाजूने लढणाऱ्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचा उभं राहून टाळ्या वाजवत सन्मान केला. या प्रकाराचे तीव्र पडसाद कॅनडामध्ये व सोशल मीडियावरही पाहायला मिळाले.

हेही वाचा : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंची भर संसदेत मोठी चूक; स्वत: अध्यक्षांना मागावी लागली माफी!

ट्रुडो यांचे विरोधक व पंतप्रधानपदाचे दावेदार पायरे पॉलिवरे यांनी ट्रुडोंना लक्ष्य केलं आहे. “ट्रुडो यांच्या पक्षानं झेलेन्स्की यांच्या भेटीदरम्यान देशाच्या संसदेत नाझी अधिकाऱ्याचा सन्मान करण्याचं नियोजन केलं. पण यात मुख्य चूक जस्टिन ट्रुडो यांचीच आहे. कारण संसदेमध्ये एखाद्या अतिथीचा सन्मान करायचा असल्यास त्याचं नियोजन पंतप्रधान कार्यालयाकडून केलं जातं”, अशी टीका पॉलिवरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केली.

हेही वाचा : “कॅनडात संघटित गुन्हेगारी, फुटीरतावादी शक्ती, हिंसाचार आणि…”, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संसद अध्यक्षांची माफी

दरम्यान, हे प्रकरण तापल्यानंतर कॅनडाचे संसद अध्यक्ष अँथनी रोटा यांनी देशातील व जगभरातील ज्यू समुदायाची माफी मागितली होती. “संसदेतील इतर सदस्य व युक्रेनच्या शिष्टमंडळालाही जस्टिन ट्रुडो यांच्याकडून संबंधित नाझी अधिकाऱ्याचं कौतुक केलं जाणार असल्याबाबत काहीही माहिती नव्हती. त्यांनी प्रत्यक्ष त्यांचं निवेदन केल्यानंतरच सभागृहाला हे समजलं”, असं रोटा आपल्या माफीनाम्यामध्ये म्हणाले होते.