पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना दिलेल्या धमकीवजा आदेशामुळेच आपल्याला कोलकाता भेट रद्द करणे भाग पडले, असा आरोप वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांनी शुक्रवारी केला.
कोलकाता विमानतळावर उतरल्यानंतर तातडीने विमानतळावरूनच दुसऱ्या विमानाद्वारे त्यांची गच्छंती करावी, असे आदेश ममता बॅनर्जी यांनी आपल्या भेटीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांना दिले होते. या आदेशामुळे पोलिसांनी आपली कोलकाता भेट  ‘अशक्य’ तर करून टाकलीच त्याचबरोबर प्रसारमाध्यमे व मुस्लिम नेत्यांना आपल्या कार्यक्रमाची माहिती देऊन त्यांना निषेध व्यक्त करण्यासाठी चिथावणीही दिली, असे रश्दी यांनी गुरुवारी सादर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.  
कोलकाताला जाण्यासाठी सज्ज असताना त्याच्या एक दिवस अगोदर पोलिसांकडून आपल्या शहर-भेटीला मज्जाव करण्यात येईल, असे आपल्याला सांगितले गेले. पोलीस शहरात प्रवेश करू देणार नाहीत व कोणत्याही प्रकारे तसा प्रयत्न झाल्यास लगोलग दुसऱ्या विमानाने आपली राज्याबाहेर पाठवणी करण्यात येईल, असे आपल्याला सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशवजा विनंतीवरूनच ही बंदी घातली गेली, असेही त्यांनी म्हटले आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ३० जानेवारी रोजी होणाऱ्या साहित्यिकांच्या सभेत रश्दी हे ‘आकस्मिक पाहुणे’ म्हणून सहभागी होणार होते. आपल्या कादंबरीवर आधारित ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ चित्रपटाच्या च्या प्रमोशनातही ते सहभाग घेणार होते, मात्र आयोजकांनी त्यांना बोलावण्याचे टाळले.कोलकाता येथील साहित्य सभेत मी सहभागी होणार होतो ही गोष्ट खरी आहे. चित्रपट दिग्दर्शिका दीपा मेहता, अभिनेता राहुल बोस आणि रुचिर जोशी ३० जानेवारी रोजी होणाऱ्या या वार्तालापात सहभागी होणार होते. आयोजकांना याची जाणीव होती व म्हणूनच त्यांनी मला  ‘आकस्मिक पाहुणे’ म्हणून निमंत्रण धाडले होते. आता ही गोष्ट जर ते अमान्य करत असतील तर तो त्यांचा अप्रामाणिकपणा आहे. त्यांनी मला विमानाच्या तिकिटाचे पैसेही दिले आहेत, असेही रश्दी यांनी म्हटले आहे.बुकर पुरस्कार विजेते रश्दी यांनी याबाबत ट्विटरवरही हेच भाष्य केले आहे. त्यात ते म्हणतात, कोलकातात प्रवेश करू नका, असा ‘मित्रत्वाचा सल्ला’ आपल्याला कोणीही दिला नाही, त्याउलट ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना माझ्या प्रवेशबंदीचे आदेश दिल्याचे रश्दी यांनी म्हटले आहे.दरम्यान, देश सोडण्याअगोदर गुरुवारी मुंबईत सलमान रश्दी यांनी ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’च्या प्रीमियरला हजेरी लावली. या चित्रपटातील कलावंतही या प्रसंगी हजर होते.

‘रश्दी खोटे बोलत आहेत’
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ३० जानेवारी रोजी होणाऱ्या साहित्यिकांच्या सभेत आपण ‘आकस्मिक पाहुणे’ म्हणून सहभागी होणार होतो, हे रश्दी यांचे विधान निव्वळ खोटे असल्याचे कोलकाता साहित्य सोहळा आणि पुस्तक प्रदर्शनाच्या नियोजकांनी म्हटले आहे. रश्दी यांना सोहळ्यामध्ये कोणतेही निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. ते निश्चितच प्रसिद्ध लेखक आहेत, मात्र जर त्यांना निमंत्रण दिले असेल, तर त्यांना ते दाखविण्यास सांगावे, असा सवाल सोहळ्याचे नियोजक त्रिदीब चटर्जी यांनी केला. रश्दींचे नाव सोहळ्याच्या निमंत्रितांमध्ये येऊ नये म्हणून कोणत्या प्रकारचा राजकीय दबाव आला होता का, याबाबत सांगताना चटर्जी म्हणाले की, आमच्या संस्था अथवा सोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘माझ्या सांगण्यावरून ममतांची कार्यवाही’
सलमान रश्दी यांच्या कोलकाता भेटीवर पोलिसी मज्जाव आणण्याची कार्यवाही ममता बॅनर्जी यांनी आपल्या सांगण्यावरून केल्याचे येथील एका इमामाने स्पष्ट केले. रश्दी यांच्या भेटीमुळे कोलकात्यामधील शांतता आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचेल. धार्मिक तिढा निर्माण होईल अशी भीती व्यक्त केल्यानंतर रश्दींना शहरात येऊ दिले जाणार नाही, अशी ग्वाही ममतांनी दिल्याचे टिपू सुलतान मशिदीमधील शाही इमाम सईद नूर-ऊर रेहमान बरकती यांनी शुक्रवारी सांगितले.