पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पंजाब काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांनी पक्षातच राहणार असल्याचे म्हटले आहे. सिद्धू यांनी सोनिया गांधींना पत्र लिहित राजीनामा देत असल्याची माहिती दिली आहे. काही दिवासांपासून पंजाबच्या राजकारणात रोज नवीन बदल पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वादाने राजकीय घडामोडींना सुरूवात झाली होती. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला होता. नवे मुख्यमंत्री नेमण्यात आल्यानंतरही नवज्योतसिंग सिद्धधू यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पदाचा राजीनामा देताना सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. “एखाद्याच्या चारित्र्याचा ऱ्हास तडजोडीने सुरू होतो. मी पंजाबच्या भविष्याशी आणि पंजाबच्या कल्याणाच्या अजेंड्याशी कधीही तडजोड करू शकत नाही. त्यामुळे मी पंजाब काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. मी काँग्रेसची सेवा करत राहीन,” असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. त्यावर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नवज्योतसिंग सिद्धू यांचे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी वाद सुरू होते. नंतर कॅप्टन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर काँग्रेसने चरणजित सिंग चन्नीला पंजाबचे मुख्यमंत्री बनवले. यानंतर, काँग्रेसने पंजाबमध्ये सर्व काही ठीक केले आहे असे मानले जात होते. मात्र, आता सिद्धू यांनी राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

“मी तुम्हाला सांगितले होते… ती एक स्थिर व्यक्ती नाही आणि पंजाब राज्यासाठी योग्य नाही,” असे अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंजाबचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आग्रही भूमिका घेतली गेल्याची आणि राजीनामा देणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Capt amarinder singh reaction after navjot singh sidhu resignation abn
First published on: 28-09-2021 at 15:50 IST