राजधानी दिल्लीतील महिपालपूरमध्ये एका व्यक्तीला कारबरोबर फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला असून ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला फरपटत नेलं जात आहे, ती व्यक्ती संबंधित कारची मालक आणि चालक होती. आरोपींनी पीडित चालकावर हल्ला करून कार घेऊन पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित मृत व्यक्तीचं नाव बिजेंद्र असून तो फरिदाबाद येथील रहिवासी आहे. मंगळवारी (१० ऑक्टोबर) रात्री काही दरोडेखोरांनी बिजेंद्र यांच्यावर हल्ला करून कार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिजेंद्र यांनी आरोपींना आडवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींनी निर्दयीपणे बिजेंद्र यांना फरपटत नेलं. घटनास्थळावरून सुमारे दीड किलोमीटरपर्यंत आरोपींनी बिजेंद्र यांना फरपटत नेलं. यानंतर त्यांनी बिजेंद्र यांना रस्त्याच्या मध्यभागी जखमी अवस्थेत सोडून पळ काढला.

हेही वाचा- “मलाच माझी लाज वाटतेय”; पिंकी गुप्ता आत्महत्याप्रकरणी सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा, लिव्ह-इन-पार्टनर अटकेत

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या बिजेंद्र यांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. पण येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही वेळातच बिजेंद्र यांना मृत घोषित केलं.

हेही वाचा- तोंडावर लाथा मारत फरपटत नेलं, बाळ जमिनीवर पडलं तरीही आईला बेदम मारहाण

रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पीडित व्यक्तीला रस्त्यावरून फरपटत नेल्यानंतर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. लवकरच आरोपींना जेरबंद केलं जाईल, असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला.