Carbide gun: दिवाळीचा सण संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. यादरम्यान फटाक्यांमुळे काही अप्रिय घटनादेखील घडल्या. अशीच एक घटना मध्य प्रदेशातही घडली. मध्य प्रदेशात ऐन दिवाळ सणात कार्बाइड गनमुळे मोठी घटना घडली आहे. जवळपास ३०० जणांच्या डोळ्यांना कार्बाइड गनच्या वापरामुळे तीव्र दुखापत झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ३० लहान मुलांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून १४ मुलांना अंधत्व आलं आहे. दिवाळीच्या दिवसात वापरल्या जाणाऱ्या या कार्बाइड गन एखाद्या रासायनिक बॉम्बपेक्षा कमी नाहीत.
आहे खेळणं पण तेवढंच खतरनाक
कार्बाइड गन हे घरातच तयार करता येणारं एक उपकरण आहे. जे प्लास्टिक किंवा पाइपपासून तयार केले जाते. हे कॅल्शियम कार्बाइड आणि पाण्याचा वापर करून केमिकल रिअॅक्शन तयार करतं. यामुळे एक मोठा धमाका होतो. हे उपकरण एखाद्या खेळण्यासारखं दिसत असलं तरी ते खूपच हानिकारक आहे. कार्बाइड गनमध्ये कॅल्शियम कार्बाइड, माचिसच्या काड्या आणि दारू यांचं मिश्रण असतं. या कॅल्शियम कार्बाइडमध्ये पाणी मिसळल्याने एसिटिलीन गॅस तयार होतो. ते जळल्याने एक शक्तिशाली धमाका होतो, त्यामुळे तीव्र उष्णता आणि हानिकारक गॅस बाहेर फेकला जातो. या कार्बाइड गन ऑनलाइन पीवीसी मंकी रिपेलर गन या नावाने विकल्या जातात.
कार्बाइड गनमुळे दृष्टीला धोका
एक्सपर्ट्सने सांगितल्याप्रमाणे, कार्बाइड गनमुळे रिलीज होणारा एसिटिलीन गॅस डोळ्यांच्या कॉर्नियाला ९० टक्के जाळून टाकतं. सेफ्टी गियरचा वापर केल्याशिवाय लहान मुलांसाठी हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. मध्य प्रदेशात अशा अनेक प्रकरणांमध्ये कॉर्नियाला सूज आणि जळजळ अशा केसेस समोर आल्या आहेत. डोळे हे अगदी संवेदनशील असतात. अशावेळी छोटीशी ठिणगीदेखील डोळ्यांना गंभीर नुकसान पोहोचवू शकते.
कॉर्नियावर थेट परिणाम
या गनमधून निघणाऱ्या तीव्र ठिणग्या आणि उष्णता थेट कॉर्नियाला नुकसान पोहोचवतात. यामुळे डोळ्यांना इजा, जळजळ आणि सूज येते. पाइन गनमधून निघणारे तुकडे किंवा जळते कण डोळ्यांच्या आतमध्ये गंभीर दुखापत करू शकतात.
कार्बाइड गनमुळे दुखापत झाल्यास ही लक्षणं दिसतात
डोळ्यांमध्ये तीव्र वेदना आणि अश्रू
प्रकाशाकडे पाहण्यास अडचण
डोळ्यांना अंधुक दिसणं
डोळ्यांमधून रक्त येणं
डोळ्यांवर काळे-पांढरे डाग दिसणं
कार्बाइड गनमुळे इजा झाल्यास कोणते उपाय करावेत
कार्बाइड गनमुळे इजा झाल्यास अजिबात डोळे चोळू नका. त्वरित पाण्याने डोळे हळूहळू स्वच्छ करा. डोळे साधारण १० ते २० मिनिटे धुवा. लवकरात लवकर डॉक्टरकडे जा.
दरम्यान जिथे या गन विकल्या जातात त्या त्या ठिकाणी त्यावर बंदी घालण्यात आली होती. सरकारने याच्या विक्रीवर बंदी घातली होती. खेळणं म्हणून खुल्या बाजारात या गन १५० ते २०० रूपयांना विकल्या जात होत्या. एवढंच नाही तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरदेखील ५०० ते २००० रूपयांपर्यंत विकल्या जातात. या गनचं आकर्षण म्हणून अनेकांनी त्या घरी बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या चेहऱ्यावरच फुटल्याने त्यांची दृष्टी गेली असे अनेक अनुभव सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केले आहेत.
