कोची : केरळमधील कोचीच्या किनाऱ्याजवळ रविवारी लायबेरियाचे मालवाहू जहाज बुडाले असून त्यावरील सर्व २४ जणांना वाचवण्यात यश मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या जहाजावर ६४० कंटेनर होते, त्यापैकी १३ कंटेनरमध्ये धोकादायक पदार्थ होते. हे जहाज शनिवारीच तिरके झाले होते. त्यानंतर त्यावरील कर्मचाऱ्यांची सुटका करण्याचे काम तटरक्षक दलाने हाती घेतले.
जहाजावरील सर्वांची सुटका करण्यात यश आले असले तरी ते बुडाल्यानंतर त्यातील तेल समुद्रात सांडण्याची भीती आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘एमएससी ईएलएसए ३’ हे लायबेरियाचे मालवाहू जहाज रविवारी सकाळी ७.५०च्या सुमाराला बुडाले. आतापर्यंत समुद्रात तेलगळती झाली नसली तरी तो धोका लक्षात घेऊन तटरक्षक दल आणि भारतीय नौदल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, तसेच प्रदूषणाचा प्रतिकार करण्याची यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. त्यासाठी तेल गळती शोधक यंत्रणा हवाई टेहळणी करत आहेत, अशी माहिती संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, बुडालेल्या जहाजावर ६४० कंटेनर होते. त्यापैकी १३ कंटेनरमध्ये धोकादायक पदार्थ होते आणि १२ कंटेनरमध्ये कॅल्शियम कार्बाईड होते. तसेच जहाजावर एकूण ८४.४४ मेट्रिक टन डिझेल आणि ३६७.१ मेट्रिक टन फर्नेस ऑइल होते. तटरक्षक दलाने शनिवारीच २१ जणांची सुटका केली होती. तर रविवारी ‘आयएनएस सुजाता’ने उरलेल्या तिघांची सुटका केली.
सरकातर्फे सावधगिरीचा इशारा
बुडालेल्या कंटेनरपैकी कोणतेही कंटेनर किनाऱ्याला लागले किंवा तेलगळती होऊन तेल किनाऱ्यापर्यंत आले तर त्याला हात लावू नये असा इशारा केरळच्या आपत्ती प्रतिसाद व्यवस्थापन प्राधिकरणाने सामान्य जनतेला दिला आहे.