स्पेनपासून वेगळे होण्याचा ठराव संसदेत मंजूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या चार वर्षांपासून स्वतंत्र होण्यासाठी धडपड करणाऱ्या स्पेन पूर्वेतील कॅटलान प्रातांच्या पार्लमेंटने  शुक्रवारी स्पेनपासून वेगळे होत स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा ठराव मंजूर केला. यावेळी मतदानापूर्वीच विरोधकांनी सभात्याग करीत मतदानावर बहिष्कार टाकला. तर कॅटलानच्या प्रांतीय पार्लमेंटने स्वत:ला स्वतंत्र्य घोषित केल्यानंतर स्पेनचे पंतप्रधान मारिआनो राहॉय यांनी ट्वीट करीत लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

स्पेनने कॅटलानला स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याला आधीपासूनच विरोध केला असून मॅडरिड सरकार कॅटलानची सुत्रे हातात घेण्याच्या  तयारीत आहे. हा ठराव कॅटलानला स्वतंत्र राष्ट्र करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करीत स्पेनसोबत कॅटलानला समान दर्जा देण्याबाबत चर्चा करण्यासाठी पारित करण्यात आला आहे. कॅटलान पार्लमेंटच्या ७० सदस्यांनी स्पेनपासून वेगळे होण्याच्या बाजूने मतदान केले. तर या विरोधात १० सभासदांनी मतदान केले. तर दोन सभासद अनुपस्थित होते. १३५ सदस्यांच्या कॅटलना पार्लिमेंटमध्ये विरोधकांनी या प्रस्तावावर विचार करण्यास नकार दिला.

दरम्यान या स्वायत्त प्रदेशाला कलम १५५ नुसार स्पेनच्या केंद्र सरकारच्या नियंत्रणात आणण्याचा ठराव स्पेनकडून मंजूर केला जाण्याची शक्यता आहे.  स्पेनपासून वेगळे होण्याच्या निर्णयाबाबत जनमताचा कौल घेण्यात आला होता. या वेळी लष्कर आणि जनतेच्या चकमकीत सुमारे ४०० लोक जखमी झाले. तर केवळ ४२ टक्के जनतेने मतदान केले. त्यातील ९० टक्के जनतेने स्पेनपासून वेगळे होण्याच्या बाजूने कौल दिला होता.

स्पेनच्या लोकसंख्येच्या १६ टक्के लोक कॅटलान प्रांतात राहतात. स्पेनच्या अर्थव्यवस्थेतेत जवळपास २० टक्के वाटा हा कॅटलानचा आहे.

कॅटलान पार्लिमेंन्टच्या निर्णयानंतर स्पेन सरकारकडून कॅटलानची सुत्रे हाती घेण्याच्या हालाचाली सुरु झाल्याअसून यामुळे या प्रांतातील शांततेचा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

जर्मनीचा विरोध

कॅटलानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास जर्मनीने विरोध दर्शविला आहे. या ठरावामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता असून अशाप्रकारे एकतर्फी स्वांतत्र्याची घोषणा केल्यामुळे स्पेनच्या प्रादेशिक एकात्मतेचे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाले असल्याचे जर्मन सरकारचे प्रवक्ते स्टीफन सेबर्ट यांनी सांगितले. स्पेनचे पंतप्रधान मारिआनो राहॉय यांच्या शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या भूमिकेचे आपण समर्थन करीत असल्याचेही त्यांनी म्हटले.

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Catalonia declares independence from spain in defiant parliament
First published on: 28-10-2017 at 04:13 IST