मुख्यमंत्री कार्यालयावर सीबीआयचा छापा पडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकार विरोधात मोठी आघाडीच उघडली आहे. मोदी सरकारने विरोधकांना संपविण्याचे आदेश सीबीआयला दिल्याचा नवा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
केजरीवाल यांच्या घणाघाती आरोपामुळे आता ‘आप’ आणि केंद्र सरकारमधील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. सीबीआयला विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याचे काम मोदी सरकारने दिले आहे आणि जे ऐकणार नाहीत त्यांना संपविण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आल्याचे कालच एका अधिकाऱयाने मला सांगितले, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.
प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापे मारल्यानंतर ‘आप’ केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाला आहे. केजरीवालांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भ्याड, मनोरुग्ण म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत केजरीवाल यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केले. अरुण जेटली दिल्ली क्रिकेट संघटना डीडीसीएचे अध्यक्ष असताना मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ‘आप’ने केला होता.