CBI Raid IRS Officer Locations : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ३१ मे रोजी वरिष्ठ आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंगल यांच्यासह आणखी एका व्यक्तीला लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करत कारवाई केली होती. आयआरएस अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून ४५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तसेच या तक्रारदाराला आयकर विभागाकडून सवलत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. या प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली.

रविवारी २५ लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अधिकारी अमित कुमार सिंगल यांच्या संबंधित घरांवर सीबीआयने छापे टाकले. यावेळी ३.५ किलो सोनं, २ किलो चांदी आणि १ कोटी रुपयांची रोकड सीबीआयने जप्त केली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. सिंगल हे २००७ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी असून ते दिल्लीतील करदाता सेवा संचालनालयात अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

या कारवाईबाबत सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “केंद्रीय अन्वेषण विभागाने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि साहित्य जप्त केलं आहे. ज्यामध्ये सुमारे ३.५ किलो सोने आणि २ किलो चांदीचा समावेश आहे, ज्याची किंमत सुमारे ३.५ कोटी रुपये आहे. तसेच रोख रक्कम अंदाजे १ कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहेत”, असं सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

या प्रकरणातील चौकशीत असं आढळून आलं की दिल्ली, मुंबई आणि पंजाबमध्ये या अधिकाऱ्याची मालमत्ता आहे. विविध बँकांमधील लॉकर आणि २५ बँक खात्यांचे कागदपत्रे व दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील स्थावर मालमत्ता आणि मालमत्तेचे कागदपत्रे व सर्व मालमत्तेचे एकूण मूल्य अद्याप निश्चित झालेलं नाही.

सीबीआयच्या एफआयआरनुसार, एका व्यक्तीला जारी केलेल्या आयकर नोटीसचा निपटारा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने तब्बल ४५ लाख रुपयांची लाच मागितली होती. तसेच तक्रारदाराने आरोप केला आहे की, पैशाच्या मागणीसह कायदेशीर कारवाई आणि मोठा दंड ठोठावण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. तसेच तक्रारदाराला शनिवारी पंजाबमधील मोहाली येथील निवासस्थानी २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता पोहोचवण्यास सांगण्यात आलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर सीबीआयकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने सापळा रचला आणि आरोपीच्यावतीने तक्रारदाराकडून २५ लाख रुपयांची लाच मागताना आणि स्वीकारताना संबंधित आयआरएस अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्याला रंगेहाथ पकडलं. त्यानंतर त्याच दिवशी आयआरएस अधिकारी सिंघल यांना दिल्लीतील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. रविवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.