दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर सीबीआयने धाड टाकली आहे. खुद्द मनिष सिसोदिया यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. या छापेमारीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

“आज पुन्हा एकदा सीबीआयचे अधिकारी माझ्या कार्यालयात आले आहेत. मी त्यांचे स्वागत करतो. त्यांनी माझ्या घरावर छापेमारी केली. कार्यालयातही छापेमारी केली. माझ्या लॉकरची तपासणी करण्यात आली. माझ्या गावापर्यंत त्यांनी चौकशी केली. मात्र माझ्याविरोधात अद्याप काहीही सापडलेले नाही. भविष्यातही काही आढळणार नाही. कारण मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी प्रामाणिकपणे दिल्लीतील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून काम करत आलो आहे,” असे मनिष सिसोदिया आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मागील वर्षी ऑगस्ट महिन्यातही मनिष सिसोदिया यांच्यासहित २१ ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली होती. दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या अन्य नेत्यांनी भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मनिष सिसोदिया यांना लवकरच अटक केली जाणार आहे, असा दावाही त्यावेळी आप पक्षाने केला होता.