CBSE Exam Results 2025 Srishti Sharma : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल मंगळवारी (१३ मे) जाहीर झाला. या परिक्षेत हरियाणाच्या सृष्टी शर्मा हिने ५०० पैकी ५०० गुण मिळवत मोठ यश संपादन केलं आहे. देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सृष्टीने या यशाचं श्रेय कुटुंबाला दिलं आहे. दरम्यान, सृष्टीने प्रसारमाध्यमांशी बोलताना विद्यार्थ्यांना तिच्या यशाचा मंत्र सांगितला आहे. ती म्हणाली, “हे यश पाहून मी खूप खूश आहे. माझे पालक व शिक्षकांमुळेच मी इतकी चांगली कामगिरी करू शकले”.
सृष्टी शर्मा म्हणाली, “मी कधीच ट्युशन (खासगी शिकवणी) लावली नाही. त्याऐवजी मी घरीच दररोज २०-२० तास अभ्यास करायचे. माझ्या पालकांनी मला खूप सहकार्य केलं. माझे वडील हेच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहेत. त्यांनी नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळेच मी पैकीच्या पैकी गुण मिळवू शकले असं मला वाटतं. मला स्वतःवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मी ट्युशनची मदत घेतली नाही. मला असं वाटतं की आपण योग्य पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच मोठं यश मिळतं. आपण प्रत्येक अडचण पार करू शकतो”.
सृष्टी शर्माचा यशाचा मार्ग
सीबीएसई टॉपर सृष्टी म्हणाली, “परीक्षा सुरू झाल्यावर माझा विश्वास थोडा डळमळीत झाला होता खरा, मात्र माझ्या पालकांनी मला हिंमत दिली. आता निकाल पाहून खूप बरं वाटतंय. माझे बाबा नेहमीच म्हणत होते की मी खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईन. माझ्या बाबांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणूनच मला हे यश मिळालं असं मला वाटतं. मी देखील खूप मेहनत केली. २०-२० तास अभ्यास केला. पुस्तकातील एकेक शब्द वाचला. एकही शब्द सुटू दिला नाही. तुम्ही खूप मेहनत केली, स्वतःवर विश्वास ठेवला तर कुठलंही लक्ष्य अवघड नसतं.
सीबीएसईचा निकाल
यंदा ‘सीबीएसई’च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९३.६६, तर बारावीचा निकाल ८८.३९ टक्के लागला आहे. तर ‘सीबीएसई’चा महाराष्ट्राचा दहावीचा निकाल ९६.६१ टक्के, तर बारावीचा निकाल ९०.६८ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या निकालात किंचितशी वाढ झालेली आहे.