दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आम आदमी पार्टी असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. भाजपाने आजच आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये तिहार तुरुंगात असलेल्या जैन यांना मसाज दिला जात असल्याचं दिसत आहे. जैन यांना विशेष सेवा पुरवल्या जात असल्याचा ठपका ठेवत तिहार तुरुंगातील पोलीस निरिक्षक अजित कुमार यांना निलंबित करण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाने हा व्हिडीओ जारी केला आहे.

तिहारमधील सुत्रांच्या हवाल्याने ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ जुना आहे. तुरुंग प्रशासनाने पूर्वीच संबंधित अधिकाऱ्याविरोधात आणि तुरुंग प्रशासनातील कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे आरोग्यमंत्री असलेल्या सत्येंदर जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने ३० मे रोजी अटक केली.

यापुर्वीही जैन यांना विशेष सुविधा तुरुंगामध्ये पुरवल्या जात असल्याचे आरोप करण्यात आले होते. डोक्याला मसाज, पायाला मजास करुन देण्याबरोबर पाठ चोळून देण्यासारख्या विशेष सेवा त्यांना तुरुंगातील कर्मचाऱ्यांकडून पुरवल्या जात होत्या. ईडीने या आरोपांसंदर्भातील पुरावेही न्यायालयामध्ये सादर केले होते.

“अनोखळी लोक त्यांना कोठडीमध्ये मसाज आणि फूट मसाज देत असल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे कर्फ्यू अवर्स (तुरुंग प्रशासनाचं दैनंदिन काम संपल्यानंतर) या सेवा दिल्या जात होता. त्यांना वेगळं जेवणही दिलं जातं,” असं अतिरिक्त सॉलिसीटर जनरल एस. व्ही राजू यांनी ईडीची बाजू न्यायालयासमोर मांडताना म्हटलं होतं. यावेळेस त्यांनी सीसीटीव्ही फुटेज न्यायालयासमोर सादर केले. जैन हे अनेकदा रुग्णालयात दाखल असतात किंवा कोठडीत असताना अशा विशेष सेवा त्यांना दिल्या जातात असं ईडीने म्हटलं आहे. ५८ वर्षीय जैन हे ३० मे पासून पोलिसांच्या ताब्यात आहेत.

“तुरुंगामध्ये व्हीव्हीआयपी सेवा. अशा मंत्र्याची बाजू केजरीवाल घेणार का? त्यांना पदावरुन हटवलं पाहिजे की नाही? यावरुन आपचा खरा चेहरा समोर येत आहे,” असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी ट्वीटवरुन म्हटलं आहे. त्यांनी दोन व्हिडीओ शेअर केले असून एकामध्ये जैन यांना मसाजची सेवा दिली जात असल्याचं दिसतंय तर दुसऱ्यात जैन यांना पाय चोळून दिले जात असल्याची दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ईडी’ने सत्येंदर जैन आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांच्या ४ कोटी ८१ लाख रुपयांच्या मालमत्तांवर एप्रिलमध्ये टाच आणली होती. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने ही कारवाई केली होती. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार सीबीआयने २०१७ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ‘ईडी’ने या प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणी सीबीआयने जैन यांची चौकशीही केली होती. मात्र, चार कंपन्यांकडे प्राप्त झालेल्या निधीचे स्रोत काय आहेत, याबाबत ते स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, असे सीबीआयचे म्हणणे आहे. तसेच ‘ईडी’नेही २०१८ मध्ये या प्रकरणी जैन यांची चौकशी केली होती. जैन यांच्याकडे आरोग्य खात्याबरोबरच उद्योग, ऊर्जा, नगरविकास आणि पाणीपुरवठा ही खाती आहेत.