सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘INDIA’ आघाडीची घोषणा केल्यानंतर भाजपानेही एनडीएमधील घटक पक्षांना एकत्र घेत बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील एनडीएच्या खासदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या खासदारांना मुस्लीम महिलांबरोबर रक्षाबंधन साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) खासदारांना रक्षाबंधन सणाचं औचित्य साधत मुस्लीम महिला वर्गापर्यंत पोहोचण्यास सांगितलं आहे. तसेच भाजपा सरकारने तिहेरी तलाकवर बंदी घातली. त्यामुळे मुस्लीम महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना आहे, या निर्णयाबाबत मुस्लीम महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या अनुषंगाने एनडीएच्या खासदारांनी मुस्लीम महिलांबरोबर रक्षाबंधन साजरी करावी, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या.
हेही वाचा- “सरकार आणखी किती खोटं बोलणार?” आव्हाडांकडून संभाजी भिडेंबाबतचा थेट पुरावाच सादर, पाहा VIDEO
सध्या भाजपाकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, एनडीएतील ३८ पक्षांमध्ये सामंजस्य वाढवण्याच्या उद्देशाने बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्यामुळे एनडीएच्या खासदारांनी मुस्लीम महिलांबरोबर रक्षाबंधन साजरी करावी, असं वृत्त ‘द हिंदू’ने NDA च्या बैठकीला उपस्थित असलेल्या एका खासदाराच्या हवाल्याने दिलं आहे.
हेही वाचा- पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर अजित पवारांची मणिपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया, म्हणाले…
“मुस्लीम महिलांबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, तिहेरी तलाक बंदीचा निर्णय मुस्लीम महिलांसाठी मोठा प्रोत्साहन देणारा ठरला आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने एनडीएच्या खासदारांनी त्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करावेत” असंही संबंधित खासदाराने सांगितलं. यावर्षी बहीण-भावाच्या अतूट नात्याचा रक्षाबंधन हा सण ३० ऑगस्ट रोजी येणार आहे.
