Fact Check Of India-Pakistan War News: ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षात भारताचा पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि चिनी सी४ गुप्तचर यंत्रणेकडून ‘पराभव’ झाल्याची कबुली उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी दिल्याचा दावा करणाऱ्या अनेक सोशल मीडिया पोस्ट पाकिस्तानी युजर्सकडून व्हायरल करण्यात येत आहेत. मात्र, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक विभागाने हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

हा खोटा दावा करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांच्या फोटोसह करण्यात येत आहेत. ज्यामध्ये जनरल सिंह म्हणतात की, “पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि सी४ गुप्तचर क्षमतांनी आम्हाला खरोखरच आश्चर्यचकित केले. भारताला पराभूत करण्यात चिनी तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली आहे.”

‘ब्रेकिंग’ असे कॅप्शन असलेल्या इतर पोस्टमध्येही हाच दावा करण्यात येत आहे. त्या पाकिस्तानी युजर्सकडून असे म्हणले जात आहे की, एका भारतीय जनरलने कबूल केले आहे की पाकिस्तानच्या कथित विजयात चिनी तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका होती.

एका युजरने तर असाही दावा केला की, “भारतीय लष्कराचे वरिष्ठ जनरल म्हणाले की, पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि सी४ गुप्तचर क्षमतेने आम्हाला खरोखरच आश्चर्यचकित केले आहे.”

दरम्यान, यापैकी अनेक पोस्टमध्ये कथित टिप्पण्या ऑपरेशन सिंदूरशी संबंधित आहेत, ज्यामुळे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील या खोट्या प्रचाराला आणखी चालना मिळाली आहे.

खोटा दावा करणाऱ्या या व्हायरल पोस्टना उत्तर देण्यासाठी, पीआयबीने एक फॅक्ट चेक करणारी पोस्ट ‘एक्स’वर शेअर केली, ज्यात स्पष्ट केले की लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी कधीही असे कोणतेही विधान केले नाही आणि त्यांचे नाव घेऊन केला जात असलेला दावा पूर्णपणे निराधार आहे.

पीआयबीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पाकिस्तानी प्रचार खाती असा दावा करत आहेत की उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी म्हटले आहे की, ‘पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि सी४ गुप्तचर क्षमतेने आम्हाला खरोखरच आश्चर्यचकित केले आणि भारताला पराभूत करण्यात चिनी तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली.’ हे दावे खोटे आहेत! उपसेनाप्रमुखांनी असे कोणतेही विधान केलेले नाही.”

गेल्या आठवड्यात फिक्कीने आयोजित केलेल्या ‘न्यू एज मिलिटरी टेक्नॉलॉजीज’ परिषदेत बोलताना, लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी पाकिस्तानच्या संरक्षण तयारीवर चीनचा किती प्रभाव आहे, यावर प्रकाश टाकला. याचबरोबर पाकिस्तानला ८१ टक्के लष्करी हार्डवेअर चीनकडून येते, हे निदर्शनास आणून दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर तुम्ही आकडेवारी पाहिली, तर गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानला मिळणारे ८१ टक्के लष्करी हार्डवेअर हे चिनी आहेत,” असे राहुल सिंह म्हणाले होते.