केंद्रीय विद्यापीठातील प्राध्यापकांच्या अनेक जागा रिकाम्या असून त्या भरण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितले आहे, या जागा भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे राज्यसभेत सांगण्यात आले. केंद्रीय विद्यापीठात एकूण १६६९२ जागा मंजूर असून त्याकील ६२५१ जागा भरलेल्या नाहीत.
मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, विद्यापीठ अनुदान आयोगाने केंद्रीय विद्यापीठांना तातडीने या जागा भरण्यास सांगितले आहे. कारण केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार या विद्यापीठातील अध्यापनाच्या कामावर परिणाम होता कामा नये. केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीतही या प्रश्नावर ६ व ७ फेब्रुवारीला चर्चा झाली.
पाठपुरावा म्हणून मंत्रालयाने सर्व कुलगुरूंना पत्रे पाठवली आहेत व रिकाम्या जागा भरण्याचे आवाहन केले आहे, त्यांना प्रत्यक्ष कृती अहवालही सादर करण्यास सांगण्यात आले आहे असे श्रीमती इराणी यांनी सांगितले.
विशेष कृती गटाची स्थापना
संजय जी.धांडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती गट स्थापन करण्यात आला असून पात्रतायोग्य शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी उपाय सुचवणे हा त्याचा उद्देश आहे. पात्र शिक्षकांची कमतरता राज्य व केंद्रीय विद्यापीठात अनुक्रमे ४० व ३५ टक्के आहे.
अभिमत विद्यापीठात पात्र शिक्षकांची कमतरता २५ टक्के व संलग्न महाविद्यालयात चाळीस टक्के आहे असे त्यांनी म्हटले आहे.