काश्मीर प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोणतीच चर्चा झाली नसल्याचं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. लोकसभेत बोलताना राजनाथ सिंह यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या वृत्ताचं खंडन केलं. यावेळी काँग्रेस खासदारांनी मात्र राजनाथ सिंह यांच्या बोलण्याआधीच सभागृहाचा त्याग करत वॉकआऊट केलं होतं.

काश्मीरप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला मध्यस्थी करण्याची विनंती केली होती, असे खळबळजनक वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सोमवारी केले होते. भारताने मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे.

काश्मीर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. काश्मीर प्रश्नावर मध्यस्थता स्वीकारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. काश्मीर आमच्या राष्ट्रीय स्वाभिमानाचा प्रश्न असल्याने मध्यस्थता स्विकारुच शकत नाही. उद्या जर पाकिस्तानसोबत चर्चा झालीच तर ती अधिकृत जम्मू काश्मीवरही होईल असं राजनाथ सिंह यांनी ठामपणे सांगितलं.

तसंच जेव्हा नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली तेव्हा केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तिथे उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी दिलेली माहिती अत्यंत योग्य असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं. याआधी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी राज्यसभेत नि:संदिग्ध शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरप्रश्नी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थीची कोणतीही विनंती केलेली नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

पाकिस्तानशी असलेल्या कुठल्याही असहमतीचे मुद्दे द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवले जातील. पाकिस्तानमधून होणारा दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही. दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांचा विचार सिमला आणि लाहोर कराराअंतर्गतच केला जाईल, असे निवेदन जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वाचून दाखवले. मात्र, विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी पंतप्रधानांनीच सभागृहामध्ये निवेदन देऊन देशाला आश्वस्त करावे, अशी मागणी केली.