पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. या प्रकरणी गृह मंत्रालयाने ५ जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांसह १३ अधिकाऱ्यांना समन्स पाठवलं आहे. केंद्र सरकारच्या ३ अधिकाऱ्यांनी या १३ अधिकाऱ्यांना समन्स पाठवल्याचं वृत्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूज18 ने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी पंजाबचे पोलीस महासंचालक (DGP), पोलीस महानिरीक्षक (IG) आणि इतर वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना हे समन्स देण्यात आलं आहे. मोगा, मुक्तसर साहिब, फरीदकोट आणि तरन तारन जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांचाही समन्स बजावण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी १५० अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यांची फिरोजपूरमधील रॅली रद्द झाली. यानंतर राजकारणाचा पारा जढला आहे. भाजपा पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेवरून काँग्रेसवर निशाणा साधत आहे, तर काँग्रेस भाजपावर मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर कांगाव करत प्रपोगंडा करत असल्याचा आरोप करत आहे.

नेमकं काय झालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब दौऱ्यावर होते. ते सकाळी विमानाने भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण खराब हवामानामुळे काही काळ वाट पाहूनही हेलिकॉप्टरने जाणं अशक्य झाल्यामुळे त्यांनी अखेर गाडीनेच हुसैनीवालाला जायचा निर्णय घेतला. या दोन तासाच्या प्रवासात हुसैनीवालापासून ३० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका फ्लायओव्हरवर पंतप्रधानांचा ताफा अडकला कारण पुढे काही आंदोलक आंदोलन करत होते. २० मिनिटे थांबल्यानंतर अखेर पंतप्रधानांनी आपला दौरा रद्द करून दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला.

यावरून भाजपाकडून पंजाबमधील काँग्रेसशासित सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. खुद्द पंतप्रधानांच्याच सुरक्षेत कसूर ठेवल्याचा आरोप केंद्र सरकारने पंजाब सरकारवर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकारावर पंजाब सरकारकडे खुलासा देखील मागितला आहे. यासंदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी किमान जिवंत तरी…”, पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया

“पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर राहिलेली नाही. पंतप्रधानांनी शेवटच्या क्षणी गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. ते हेलिकॉप्टरने जाणार असल्याचं नियोजन होतं”, असं चन्नी म्हणाले आहेत. “फिरोजपूर जिल्ह्यातून पंतप्रधानांना त्यांचा दौरा अर्धवट सोडून परत जावं लागलं याविषयी मी खेद व्यक्त करतो. आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो. पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी मी भटिंडाला जाणं अपेक्षित होतं. पण माझ्यासोबत असलेल्यांपैकी काहीजण करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे मी पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी जाऊ शकलो नाही. आम्ही पंतप्रधान कार्यालयाला कळवलं होतं की तुम्ही हा दौरा रद्द करावा. कारण वातावरण आणि आंदोलकांचा मुद्दा होता. त्यांनी अचाकन त्यांच्या मार्गामध्ये बदल केल्याची माहिती आमच्याकडे नव्हती”, असं चरणजीतसिंग चन्नी म्हणाले.

हेही वाचा : … अन् त्यावेळी पंतप्रधान मोदींनी आणली होती स्वत:चीच सुरक्षा धोक्यात!

प्रचारसभेत लोकं न आल्यानंच दौरा केला रद्द?

दरम्यान, पंजाब कॅबिनेटमधले मंत्री राजकुमार विर्का यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेमध्ये कोणतीही कसूर झालेली नाही. यासंदर्भात करण्यात येणारे आरोप निराधार आहेत. यातलं सत्य हे आहे की भाजपाची प्रचारसभा फ्लॉप झाली होती. जेव्हा पंतप्रधानांना हे समजलं, तेव्हा त्यांनी दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला”, असं विर्का म्हणाले. पंतप्रधानांच्या नियोजित रॅलीमध्ये ७० हजार लोक येण्याचा अंदाज असताना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यानेच असे आरोप केले जात असल्याचं पंजाब काँग्रेसकडून सांगितलं जात आहे.

More Stories onपंजाब
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central home ministry summons 13 officers including sp of 5 districts in pm modi security breach case pbs
First published on: 07-01-2022 at 17:18 IST