Vipul Pancholi Elevated at Judge of Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने (कॉलेजियम) बढतीची शिफारस केल्यानंतर दोन दिवसांनी केंद्र सरकारने न्यायमूर्ती आलोक आराधे (मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश) आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली (पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश) यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीनंतर गुजरातच्या उच्च न्यायालयातून आलेल्या न्यायाधीशांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. या प्रादेशिक असमतोलाबाबत न्यायवृंदमधील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बीव्ही नागरत्न यांनी आक्षेप घेतला होता.
या नियुक्तीची माहिती केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून दिली. ते म्हणाले, “भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करत राष्ट्रपती, भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर i) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि ii) पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती विपुल मनुभाई पांचोली यांची भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे.”
न्यायमूर्ती यांच्या नियुक्तीला न्यायवृंदाने एकमताने सहमती दर्शवली नव्हती. सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्ष असलेल्या पाच सदस्यांच्या न्यायवृंदातील न्यायमूर्ती बीव्ही नागरत्न यांनी त्यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. तसेच पांचोली यांना विरोध करण्यासाठी त्यांनी पत्रही लिहिले होते. या पत्रात त्यांनी पांचोली यांच्या नियुक्तीमुळे ज्येष्ठता आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वात असमतोल होत असल्याचे म्हटले होते.
न्यायमूर्ती विपुल पांचोली हे सध्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अखिल भारतीय ज्येष्ठतेच्या यादीत ५७ व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर आता गुजरात उच्च न्यायालयामधील तीन न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात असतील.
सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी सरकारने शिफारस केलेल्या १४ वकिलांची नावेदेखील मंजूर केली आहेत.
कोण आहेत न्यायमूर्ती विपुल पांचोली?
न्या. पांचोली यांचा जन्म २८ मे १९६८ साली झाला. १९९१ मध्ये त्यांनी वकिलीच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात अनेक वर्ष वकिली केली. १ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांची उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. १० जून २०१६ रोजी त्यांना कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयातील सध्याचे न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या निवृत्तीनंतर ऑक्टोबर २०३१ मध्ये न्यायमूर्ती पांचोली हे भारताचे सरन्यायाधीश बनणार आहेत.