नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. करोना चाचण्यांच्या प्रमाणात झालेले घट आणि काही जिल्ह्यांमध्ये सकारात्मक रुग्ण सापडण्याचा दर वाढल्याने केंद्राने चिंता व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, नागालँड, सिक्कीम, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, राजस्थान, जम्मू-काश्मीर या राज्यांसह लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारांना  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्र पाठवून करोना चाचण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात झालेली घट चिंता वाढवणारी असल्याचे सांगितले. करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने आणि त्यामुळे निर्बंध शिथिल झाल्याने विवाह समारंभाला उपस्थित राहणे, पर्यटन, उत्सव साजरे करणे यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक जण विविध ठिकाणी प्रवास करत असून त्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

‘करोना चाचण्यांची घट झाल्याने विषाणू संसर्ग मोठय़ा प्रमाणात पसरतो. चाचण्या संख्या कमी झाल्याने करोना संक्रमणाचा वास्तवित स्तर समजण्यास अडचणी येतात.’ असे भूषण यांनी या पत्रात म्हटले आहे. मोठय़ा प्रमाणात लसीकरण होऊनही काही विकसित देशांमध्या सध्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे करोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे भूषण यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यातील करोना चाचण्यांची आणि करोनाबाधितांच्या संख्येची सविस्तर माहिती घ्यावी, असा सल्ला भूषण यांनी या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला.

५३७ दिवसांतील सर्वात  कमी उपचाराधीन रुग्ण

नवी दिल्ली  : देशात गेल्या ५३८ दिवसांतील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या मंगळवारी नोंदली गेली आहे. १ लाख ११ हजार ४८१ इतकी रुग्णसंख्या नोंदली गेली असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.३२ टक्के इतकी आहे. ही टक्केवारी मार्च २०२० नंतर इतकी कमी नोंदली गेली आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारीदेखील ९८.३३ इतकी झाली असल्याचे  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले आहे.

गेल्या २४ तासांत ९,२८३ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ४५ लाख ३५ हजार ७६३ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ४३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात केरळमधील ३७० तर महाराष्ट्रातील १९ जणांचा समावेश आहे. सलग ४७ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही २० हजारांखाली तर सलग १५० दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांमध्ये २१०३ ने घट झाली आहे. 

’ देशभरात आतापर्यंत करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ६१ हजार ३८९ झाली आहे. तर मृत्यू दर १.३५ टक्के नोंदला गेला आहे.

’ आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख ५७ हजार ६९८ जण करोनामुक्त झाले आहेत.

’ दैनंदिन रुग्णवाढीचा दर ०.८० टक्के इतका नोंदला असून सलग ५१ दिवसांपासून रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे.

’ साप्ताहिक रुग्णवाढीचा दर ०.९३ टक्के नोंदला आहे. सलग ६१ दिवसांपासून साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे.

’ भारतात लसीकरण झालेल्यांची संख्या ११८.४४ कोटी झाली आहे.