लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सध्या देशात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नेते पक्षांतर करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. काही नेते काँग्रेसमधून भाजपात तर काही भाजपामधून इतर पक्षात जात आहेत. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच हरियाणामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

हरियाणाच्या हिसारचे भाजपा खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. काही राजकीय कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं ब्रिजेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ब्रिजेंद्र सिंह यांनी राजीनामा दिल्यामुळे हिसारमध्ये भाजपाला ऐन निवडणुकीच्या तोंडावरच खिंडार पडलं आहे. भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देताना ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : लोकसभेसाठी तृणमूलकडून सर्व ४२ जागांवर उमेदवारांची घोषणा! पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी संपुष्टात?

ब्रिजेंद्र सिंह भाजपावर नाराज?

माजी केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांचे ब्रिजेंद्र सिंह हे पुत्र आहेत. ते हिसार लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपा का सोडली, याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आपण राजकीय कारणास्तव भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून ब्रिजेंद्र सिंह हे भाजपावर नाराज असल्याचंही बोललं जात होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रिजेंद्र सिंहांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच ब्रिजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी जाऊन ब्रिजेंद्र सिंह आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी काही वेळ चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ब्रिजेंद्र सिंह यांना भाजपाकडून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे त्यांनी भाजपाला रामराम केल्याची चर्चा आहे. तर ब्रिजेंद्र सिंहांना आता काँग्रेसकडून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.