चित्रफितीचा आधार घेत विरोधकांचा आरोप
नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा देण्याचा काळाधंदा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा विरोधी पक्षांनी विशेषत: काँग्रेसने केला. नोटांच्या ‘अदलाबदली’ संदर्भातील स्टिंग ऑपरेशनची चित्रफीत मंगळवारी पत्रकार परिषदेत दाखवण्यात आली. या चित्रफितीच्या आधारे विरोधकांनी भाजपवर नोटाबंदीवरून पुन्हा हल्लाबोल केला.
या कथित स्टिंग ऑपरेशनच्या चित्रफितीत पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा घेऊन दोन हजारच्या नव्या नोटा देण्याबाबत ‘बोलणी’ केली जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. अहमदाबादमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी ४० टक्के दलालीच्या बदल्यात नोटा बदलून देण्याचे आश्वासन स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या व्यक्तींना दिल्याचेही चित्रफितीत पाहायला मिळते.
हा गैरप्रकार ३१ डिसेंबर २०१६ नंतर केला गेला. जुन्या पाचशे रुपयांच्या नोटाद्वारे पाच कोटी दिले गेले आणि नव्या दोन हजाराच्या नोटांद्वारे ३ कोटी परत दिले गेल्याचा दावा चित्रफितीद्वारे करण्यात आला.
ही चित्रफीत टीएनएन डॉट वर्ल्ड या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली असून हे संकेतस्थळ ब्रिटनमध्ये नोंदणीकृत असल्याचे काँग्रेसचे नेते कपिल सिबल यांनी सांगितले. मात्र, या चित्रफितीची सत्यता पडताळून पाहिली नसली तरी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सिबल यांनी केली. ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारने नोटाबंदी लागू करून ५०० आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घातली होती.