भाजप अध्यक्षांची सुरतमधील सभा उधळली

राजकीय शक्तीप्रदर्शन साधण्यासाठी सुरतमध्ये आलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांची सभा गुरुवारी पाटीदार अनामत आंदोलन समितीने उधळली. व्यासपीठावर असलेले शहा तसेच मुख्यमंत्री विजय रुपानी व अन्य भाजप नेत्यांना ‘हार्दिक हार्दिक’ या उच्चरवातील घोषणांमुळे तसेच कार्यक्रमस्थळी मोडतोड सुरू झाल्याने काढता पाय घ्यावा लागला. या घटनेने गुजरातमधील भाजपला मोठा हादरा बसला असून हार्दिक समर्थकांचा जोर वाढला आहे.

शहरातील पटेल समाजाच्या एका उद्योजकाने स्थापन केलेल्या ‘पाटीदार अभिवादन समिती’ या संस्थेतर्फे अमित शहा यांच्या उपस्थितीत पटेल समाजातील भाजप मंत्र्यांचा सत्कार होणार होता. २०१७मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पटेल समाजाला जवळ करण्याकरिता हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. मात्र सभेआधीपासूनच हार्दिक पटेल समर्थक जमू लागले आणि घोषणा देऊ लागले होते. त्यातील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले तरी निदर्शनांचा जोर वाढतच गेला. हार्दिक पटेल समर्थकांनी उग्र रूप धारण केल्याने एकच धावपळ उडाली. हार्दिक समर्थकांनी घोषणाबाजी करतानाच सभास्थानातील सामानाची मोडतोड सुरू केली तसेच सभास्थानाबाहेर पोलिसांवर दगडफेकही सुरू झाल्याने तणावाचे वातावरण पसरले.

अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री विजय रूपानी तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील पटेल समुदायाचे मंत्री आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला व्यासपीठावर होते. भाषणे सुरू होताच जमावाने ‘हार्दिक, हार्दिक’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या गोंधळात पटेल समाजाच्या मंत्र्यांना भाषणे करता आली नाहीत. शहा केवळ चार मिनिटे बोलू शकले मात्र त्यांच्या भाषणात घोषणाबाजी अधिक तीव्र झाली होती. मुख्यमंत्री रुपानी यांनाही अवघ्या तीन मिनिटांत भाषण आटोपते घ्यावे लागले.