काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री होतील, असे ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी केले आहे. आज दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. यापूर्वी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा हरीश रावत यांनी केली आहे. तसेच चन्नी हे संध्याकाळी साडे सहा वाजता राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. महत्वाचं म्हणजे चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड यांच्या नावांची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चेत सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव होतं. मात्र, या सर्व नेत्यांना डावलून पंजाबमधील दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, चरणजीत सिंह चन्नी यांच्या निवडीनंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेले सुखजिंदर सिंग रंधावा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हा हायकमांडचा निर्णय असून मी त्याचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत. मी अजिबात निराश नाही,” असं त्यांनी म्हटलंय.

राज्यात अकाली दल आणि भाजपाची सत्ता असताना चन्नी विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी मंत्री म्हणून तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण, रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण आणि पर्यटन आणि संस्कृती व्यवहार विभागाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच पक्षाच्या नेत्यांनी मांडलेल्या मुद्द्यांकडे माजी मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत म्हणून त्यांनी अमरिंदर सिंग यांच्या विरोधात आवाज उठवला होता.

चरणजीत सिंग चन्नी चंदिगडमधील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमधून राजभवनाकडे रवाना झाले आहेत. “राज भवनातून बाहेर पडल्यानंतर मी बोलेन,” असं ते म्हणाले आहेत. तर, चन्नी यांचे कुटुंबीय देखील राजभवनाबाहेर दाखल झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charanjit singh channi new punjab chief minister congress leader harish rawat hrc
First published on: 19-09-2021 at 18:01 IST