मोरबी : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरातमधील मोरबी शहरात झालेल्या झुलता पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. अटक केलेल्या नऊ आरोपींव्यतिरिक्त पुलाचे व्यवस्थापन करणाऱ्या ओरेवा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक जयसुख पटेल यांचेही आरोपपत्रात दहावे आरोपी म्हणून नाव असल्याचे पीडितांची बाजू मांडणारे वकील दिलीप अगेचनिया यांनी सांगितले.
न्यायदंडाधिकाऱ्यांनी यापूर्वीच पटेल यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत १३५ जण ठार, तर अनेक जखमी झाले होते.
मोरबीमध्ये गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी मच्छू नदीवरील ब्रिटिशकालीन झुलत्या पुलाच्या दुरुस्तीनंतर हा पूल कोसळून ही दुर्घटना घडली होती. अजिंठा मॅन्युफॅक्चिरग लिमिटेडकडे (ओरेवा समूह) या पुलाच्या वापरासोबतच देखभालीची जबाबदारी होती. १२०० हून अधिक पानांचे हे आरोपपत्र मोरबीचे मुख्य न्यायदंडाधिकारी एम. जे. खान यांच्या न्यायालयात तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक पी. एस. झाला यांनी दाखल केले.
पूल कोसळल्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी मोरबी पोलिसांनी ओरेवा समूहाचे दोन व्यवस्थापक, दोन तिकीट नोंदणी लिपिक, पुलाची दुरुस्ती करणारे दोन उप कंत्राटदार आणि गर्दीच्या नियंत्रणासाठी तैनात तीन सुरक्षा रक्षकांसह नऊ जणांना अटक केली होती. आठवडय़ापूर्वी याच न्यायालयाने ओरेवा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक पटेलविरुद्ध या दुर्घटनेप्रकरणी अटकेचे आदेश दिले होते. पटेल यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
तीनशेहून अधिक साक्षीदार
ओरेवा समूहाच्या जयसुख पटेल यांचे नाव पोलिसांनी प्रारंभी दाखल केलेल्या गुन्ह्यांत नव्हते. मात्र शुक्रवारी दंडाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या आरोपपत्रात दहावा आरोपी म्हणून पटेल यांचे नाव आहे. या आरोपपत्रात ३०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब आहेत, असे वकील अगेचनिया यांनी पत्रकारांना सांगितले.