अधिकाऱ्यांच्या परवानग्या न घेता कन्हैय्याकुमारसह इतरांवर आरोपपत्र

पोलिसांनी सांगितले, की  जेएनयू प्रकरणी अधिकाऱ्यांच्या परवानग्या घेण्यासाठी दोन ते तीन महिने लागतील.

(संग्रहित छायाचित्र)

पोलिसांची न्यायालयात कबुली

२०१६ मधील देशद्रोहाच्या प्रकरणात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार व इतरांवर खटले भरण्यासाठी अधिकाऱ्यांनी अजून आवश्यक त्या परवानग्या दिलेल्या नाहीत, असे दिल्ली पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.

१४ जानेवारी रोजी पोलिसांनी कुमार व इतरांवर आरोपपत्र दाखल केले असून त्यात असे म्हटले होते, की कन्हैय्या कुमार हा मोर्चाचे नेतृत्व करीत होता, त्याने त्या वेळी देशविरोधी घोषणा दिल्या. ९ फेब्रुवारी २०१६ रोजी ही घटना घडली होती.

मुख्य महानगर दंडाधिकारी दीपक शेरावत यांना पोलिसांनी सांगितले,की आवश्यक त्या परवानग्या घेतल्यानंतरच आरोपपत्र दाखल करायला हवे होते हे आम्हालाही मान्य आहे. त्यावर न्यायाधीशांनी सांगतिले, की पोलिसांनी परवानग्या घेतल्यानंतरच आरोपपत्र दाखल करायला हवे होते. त्यात कुठली घाई होती हे समजत नाही. आता या प्रकरणाची सुनावणी सुरू राहील, त्यात माघार घेता येणार नाही.

पोलिसांनी सांगितले, की  जेएनयू प्रकरणी अधिकाऱ्यांच्या परवानग्या घेण्यासाठी दोन ते तीन महिने लागतील. या प्रकरणाची चौकशी करीत असलेल्या पोलिस उपायुक्तांचा अहवालही न्यायालयाने मागवला आहे. आता या प्रकरणी २९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने यापूर्वी असा आदेश दिला होता,की पोलिसांनी खटल्यासाठी परवानगी घेतली नसली तरी त्यांनी कन्हैय्या कुमार, उमर खालीद व अनिर्बन भट्टाचार्य यांच्यावर खटल्यासाठी तातडीने परवानग्या मिळवून कागदपत्रे सादर करावीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chargesheet with kanhaiya kumar without taking the permission of the authorities

ताज्या बातम्या