ChatGPT to Show Erotic Content to Adult Users : ओपनएआय कंपनीने जाहीर केलं आहे की चॅटजीपीटी आता प्रौढ वापरकर्त्यांसाठी कामुक मजकूर व सामग्री उपलब्ध करून देणार आहे. कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही प्रौढ वापरकर्त्यांना प्रौढ नजरेनेच पाहतो. ओपनएआय चॅटजीपीटीमध्ये काही नवीन अपडेट आणत आहे. त्यापैकी हा सर्वात महत्त्वाचा भाग असेल. यात वापरकर्त्यांना त्यांचे एआय सहाय्यक व्यक्तिमत्त्व कस्टमाइज करण्याची आणि मानवी उत्तरांसाठी पर्याय समाविष्ट करण्याची परवानगी मिळेल.

सध्याच्या घडीला वापरकर्ते कामुक सामग्री वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी अथवा शेअर करण्यासाठी वॉटपॅडसारख्या सोशल स्टोरीटेलिंग प्लॅटफॉर्म्सचा वापर करत आहेत. परंतु, त्यावर अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे ओपनएआयला मुक्त प्लॅटफॉर्म आणायचा आहे.

कंपनी चॅटजीपीटीमध्ये बदल करणार

ओपनएआयचे सीईओ सॅम आल्टमन यांनी यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मानसिक आरोग्याच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआयवर कडक निर्बंध लागू केल्यामुळे चॅटबॉट मानसिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या नसलेल्या काही वापकर्त्यांसाठी कमी उपयोगी किंवा कमी मनोरंजक झाला होता. त्यामुळे आम्ही चॅटजीपीटमध्ये काही नवे बदल करत आहोत.”

सुरक्षिततेवर अधिक लक्ष

कॅलिफोर्निया येथील अ‍ॅडम रायन या तरुणाच्या आत्महत्येनंतर कामुक सामग्रीबाबत कडक सुरक्षा नियम लागू करण्यात आले आहेत. अ‍ॅडमच्या पालकांनी तक्रार दाखल केली होती की चॅटजीपीटीने अ‍ॅडमला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं होतं. यावरून आल्टमन म्हणाले, “आता आम्ही मानसिक आरोग्याच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम झालो आहोत आणि आमच्याकडे नवीन साधनं देखील आहेत. त्यामुळे आम्ही सुरक्षिततेशी संबंधित निर्बंध शिथिल करण्यास सक्षम होऊ.”

पुढच्या आठवड्यात ओपनएआय चॅटजीपीटीची नवी आवृत्ती लॉन्च करणार आहे. यामध्ये लोकांना चॅटबॉटचा टोन व व्यक्तिमत्त्वावर अधिक नियंत्रण मिळेल, असं आल्टमन यांनी जाहीर केलं आहे.