वृत्तसंस्था, चंडीगड
देशाच्या उत्तर आणि वायव्य भागाबरोबरच मध्य भागातही बुधवारी मुसळधार पाऊस झाला. पूरग्रस्त पंजाब आणि हरियाणामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठा भूभाग पाण्याखाली गेला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंजाबमध्ये ७ सप्टेंबरपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.

पंजाबमधील अमृतसर, लुधियाना, पतियाळा, पठाणकोट, गुरसादपूर आणि मोहाली या जिल्ह्यांमध्ये बुधवारी सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस झाला. तर हरियाणाच्या अंबालामध्ये या कालावधीत १०५.६ मिमी इतका पाऊस झाला. त्याशिवाय हिसार, कर्नाल, नारनौल, रोहतक, सिरसा, फरीदाबाद आणि पंचकुला या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. दोन्ही राज्यांची राजधानी असलेल्या चंडीगडमध्ये ६३.६ मिमी पाऊस झाला.

हरियाणातील घग्गर, मार्कंडा आणि टांगरी या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. पंजाबच्या सतलज, बियास आणि रावी या नद्यांसह हंगामी उपनद्यांची पातळी वाढल्यामुळे त्या राज्यात मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पंजाबमध्ये एनडीआरएफ, लष्कर, बीएसएफ, पोलीस आणि जिल्हानिहाय प्रशासन यांच्यामार्फत पूरग्रस्त भागांमध्ये मदत व बचावकार्य सुरू आहे.

छत्तीसगडमध्ये पुराचे चार बळी

बलरामपूर : छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे चार जणांचा मृत्यू झाला आणि अन्य तिघे जखमी झाले अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. मंगळवारी रात्री उशिरा धनेशपूर गावातील लुट्टी (सातवाहिनी) या लहान धरणाचा काही भाग कोसळून ही जीवितहानी झाली असे अधिकाऱ्यांनी सांगितले. धरणाचा भाग फुटल्यामुळे जवळपासची घरे आणि शेतांमध्ये पाणी शिरले अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र कटारा यांनी दिली.

पूरग्रस्त प्रदेशांसाठी विशेष पॅकेजची विनंती

पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या पूरग्रस्त प्रदेशांसाठी तातडीने विशेष मदतीचे पॅकेज जाहीर करावे अशी विनंती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. राहुल यांनी बुधवारी एक्सवर एक पोस्ट लिहून पॅकेजची मागणी केली. तसेच संदेश देणारी एक ध्वनिचित्रफितही प्रसिद्ध केली. या राज्यांमधील परिस्थिती अतिशय चिंताजनक असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.

मोदीजी, अशा कठीण काळात तुम्ही लक्ष देणे आणि केंद्र सरकारने सक्रिय मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. हजारो कुटुंबे त्यांचे घर, जीवन आणि प्रियजनांना वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस

जनजीवन विस्कळीत

  • दिल्लीच्या मध्य, पूर्व, ईशान्य, शाहदरा, दक्षिण आणि आग्नेय भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
  • यमुना नदी बुधवारीही धोक्याच्या पातळीवर, निगम बोध घाट पाण्याखाली गेल्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी
  • जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या ४५ ग्रामस्थांची बीएसएफच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका
  • वैष्णोदेवी मंदिर असलेल्या त्रिकुटा डोंगराच्या पायथ्याशी २४ तासांच्या कालावधीत २०० मिमी इतका विक्रमी पाऊस
  • वैष्णोदेवी मंदिर दर्शन सलग नवव्या दिवशी बंद
  • राजस्थानच्या अनेक भागांमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत