ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेली बाली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा अखेर सुरू झाली असून इंडोनेशिया पोलिसांच्या कोठडीत असलेला कुख्यात डॉन छोटा राजनला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छोटा राजनला इंडोनेशियाच्या विमानतळावर आणण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. आज रात्रीपर्यंत त्याला भारतात आणले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

छोटा राजनला भारतात आणण्याच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या असून इंटरपोलनेही त्याच्या प्रत्यार्पणाला मंजूरी दिली आहे. त्याला बुधवारीच भारतात आणले जाणार होते पण ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाली येथील विमानतळ बंद झाल्याने राजनच्या प्रत्यार्पण लांबवणीवर पडले. सर्व शर्ती पाळल्या गेल्या व परिस्थिती अनुकूल असेल तर त्याला उद्या भारतात आणले जाईल असे सांगण्यात आले होते. राजनला लवकर भारताच्या ताब्यात दिले जाईल अशी अधिकाऱ्यांना आशा आहे. इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांना तशी विनंती करण्यात आली असून सोपस्कार जवळपास पूर्ण झाले आहेत.

राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असे असून तो अनेक गुन्ह्य़ात भारताला हवा आहे. इंडोनेशियाशी प्रत्यावर्तन करार नसल्याने भारतीय अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून राजनचा ताबा मागितला आहे. इंडोनेशियाहून दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्याला पहिल्यांदा सीबीआयच्या ताब्यात दिले जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.