गांधी कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीला ५ वर्षांसाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष करुन दाखवावे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले आव्हान काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी स्वीकारत पलटवार केला आहे. मोदींची स्मरणशक्ती कमजोर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. चिदंबरम यांनी काँग्रेसच्या १५ बिगर नेहरु-गांधी अध्यक्षांच्या नावांची यादीच त्यांनी वाचून दाखवली व मोदी आता राफेल करार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्यावर उत्तर द्यावे, असे नवे आव्हान दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्तीसगड येथे शुक्रवारी झालेल्या एका निवडणूक प्रचार सभेत मोदींनी काँग्रेसला आव्हान दिले होते. नेहरु-गांधी कुटुंबाबाहेरील एखाद्या योग्य व्यक्तीला पाच वर्षांसाठी पक्षाध्यक्ष बनवा, असे म्हटले होते. त्यानंतर चिदंबरम यांनी सलग ट्विट करत अध्यक्षांची नावेच सांगितली. तसेच काँग्रेसला स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहादुर शास्त्री, के कामराज आणि मनमोहन सिंग यांसारख्या सामान्य पार्श्वभूमीचे नेते आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या हजारो नेत्यांवर गर्व असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींची स्मरणशक्ती ठीक करण्यासाठी १९४७ नंतर काँग्रेस अध्यक्ष आचार्य कृपलानी, पट्टाभि सीतारमैय्या, पुरुषोत्तमदास टंडन, यू एन धेबर, संजीव रेड्डी, कामराज, निजलिंगप्पा, सी सुब्रमण्यम, जगजीवनराम, शंकरदयाळ शर्मा, डी के बरुआ, ब्रह्मानंद रेड्डी, पी व्ही नरसिंह राव आणि सीताराम केसरी अशी यादीच त्यांनी दिली.

मोदींवर निशाणा साधताना ते म्हणाले, मी मोदींचे आभार मानतो. कारण काँग्रेस अध्यक्ष कोणाला निवडले जाते याची त्यांना चिंता आहे. त्यांच्याकडे यावर बोलायला भरपूर वेळ आहे. ते नोटाबंदी, जीएसटी, राफेल आणि आरबीआयबाबत बोलण्यासाठी याचा अर्धा वेळ तरी देतील का असा सवालही विचारला.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, मॉब लिचिंग, महिला आणि मुलींवरील बलात्कार, गो रक्षक आणि वाढते दहशतवादी हल्ल्यांवरही मोदी बोलतील का ?, असे त्यांनी म्हटले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chidambaram slams on pm narendra modi on challenge to make non gandhi congress president
First published on: 17-11-2018 at 14:41 IST