Chief Justice BR Gavai: डिजिटल युगात मुलींच्या संरक्षणाला प्रशासनाने सर्वाधिक प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, असे भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी म्हटले आहे. मुलींचे संरक्षण म्हणजे केवळ वर्गात आणि कामाच्या ठिकाणीच तिला सुरक्षित ठेवणे नव्हे, तर डिजिटल विश्वातही तिचे भविष्य सुरक्षित करणे होय, असेही त्यांनी नमूद केले.

दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले की, आजच्या काळात तरुण मुलींना भेडसावणारे धोके केवळ भौतिक विश्वापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते अनियमित डिजिटल जगातही पसरले आहेत.

आजच्या युगात इनोव्हेशन प्रगतीची व्याख्या बनली आहे, त्यामुळे तिथे तंत्रज्ञानाचा वापर “शोषणाऐवजी मुक्तीचे साधन” म्हणून केला पाहिजे, असे सरन्यायाधीश म्हणाले. “डिजिटल विश्वात मुलींचे संरक्षण हे प्रशासनाचे मुख्य प्राधान्य असले पाहिजे. याचबरोबर ऑनलाइन लैंगिक शोषण, डिजिटल तस्करी आणि सायबर छळाशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली पाहिजे”, असेही त्यांनी म्हटले.

सरन्यायाधीश गवई म्हणाले की, “डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे आणि संधींचे नवे मार्ग खुले केले आहेत, परंतु त्यामुळे तरुण मुलींसाठी मोठी असुरक्षितता निर्माण झाली आहे. यामध्ये ऑनलाइन छळ आणि सायबर धमकीपासून ते वैयक्तिक डेटाचा गैरवापर व डीपफेक इमेजरीपर्यंत अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.”

सरन्यायाधीश गवई यांच्या मते, ऑनलाइन लैंगिक शोषण, डिजिटल तस्करी आणि सायबर छळ यांसारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षण आणि जागरूकतेची गरज आहे. “तंत्रज्ञानाचा वापर शोषणाऐवजी मुक्तीचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणात करायला हवा”, असे ते म्हणाले.

सरन्यायाधीश बी. आर. गवई हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी एका वकिलाने त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यानंतर संबंधित वकिलाने दावा केला होता की, सरन्यायाधीश गवई यांनी खजुराहो येथील भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराबाबत केलेल्या टिप्पणीमुळे आपण दुखावल्याने हा हल्ला केला.

दरम्यान, या वकिलाविरोधात सरन्यायाधीशांनी कोणतीही कारवाई करू नये, अशा सूचना न्यायालयीन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, बार कॉन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोर या हल्लेखोर वकिलाचे निलंबन केले आहे.