CJI BR Gavai Attack RSS Response: भाजपा सत्तेत असो किंवा नसो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार होतच राहील, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १०० वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. यानंतर काही दिवसांतच आंबेकर यांनी हे वक्तव्य केले आहे.
“भाजपा निवडणूक जिंको किंवा हरो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दुसऱ्या दिवशी सकाळी उठतील आणि नेहमीप्रमाणे आपले काम सुरू करतील”, असे आंबेकर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटले. यावेळी त्यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संघावर झालेल्या टीकेलाही उत्तर दिले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर पुढे म्हणाले की, “लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की संघ कोणत्याही परिस्थितीत आपले काम करत राहील. संघाच्या कार्याचा शिक्षण, कामगार आणि अगदी राजकारण अशा अनेक क्षेत्रांवर परिणाम होतो. जर संघटना चालवणारी व्यक्ती तिच्या कामात यशस्वी झाली, तर याचा अर्थ असा की त्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे काम करण्यासाठी योग्य वातावरण तयार केले आहे.”
सरकारने अडथळे निर्माण केले तर…
जर सरकारने आरएसएसच्या कामांमध्ये काही अडथळे निर्माण केले, तर संघाच्या स्वयंसेवकांना त्यावर मात करण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते, असेही सुनील आंबेकर यांनी नमूद केले. “भूतकाळातही आरएसएसला विविध उपक्रमांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. राजकीय पातळीवर लोक टीका करू शकतात, परंतु प्रत्यक्षात त्यांचे कार्यकर्ते आमचे काम पार पाडण्यास मदत करतात”, असेही ते म्हणाले.
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ला
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाची मानसिकता “भाजपा–आरएसएस”सारखी आहे, हा विरोधी पक्षाचा आरोपही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी फेटाळून लावला. “मला वाटते की लोकांना आरएसएसचे कार्य माहिती आहे. संघाचे कार्य आणि शिकवण इतकी लोकप्रिय आहे की लोकांना त्याची जाणीव आहे. त्यामुळे हे आरोप खोडून काढण्यासाठी इतकेच पुरेसे आहे”, असे ते म्हणाले.
एकटे मोदी सर्व गोष्टी करू शकत नाहीत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा “हायकमांड” आहे, या दाव्यावर बोलताना ते म्हणाले की, “मी असे म्हणत नाही की आमचा सरकारशी कोणताही संबंध नाही. फक्त एकटे मोदी देशासाठी सर्व काम करू शकत नाहीत. सर्वांना एकत्र काम करावे लागेल. आम्हाला सर्व स्तरांतील लोकांची आवश्यकता आहे.”