CJI Sanjiv Khanna: वक्फ दुरुस्ती कायद्याबाबत देशभरातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशात आता भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांचे एक विधान समोर आले आहे. त्यांनी, जर सर्वोच्च न्यायालय कायदा करणार असेल तर संसद भवन बंद केले पाहिजे असे म्हटले आहे. याबाबत एक्सवर त्यांनी व्हिडिओ शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी असाही आरोप केला की, “देशात होणाऱ्या सर्व यादवी युद्धांसाठी भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत.”

खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियांचे काही व्हिडिओ एक्सवर शेअर केले आहे. यामध्ये ते, “देशात धार्मिक युद्धे भडकवण्यास सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालय आपल्या मर्यादेपलीकडे जात आहे. जर प्रत्येक गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागत असेल तर संसद आणि विधानसभा बंद केली पाहिजे.” असे म्हणाले आहेत.

निशिकांत दुबे पुढे म्हणाले की, “तुमची नियुक्ती करणाऱ्यांनाच तुम्ही कसे निर्देश देऊ शकता? राष्ट्रपती भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात. संसद या देशाचा कायदा बनवते. तुम्ही त्या संसदेला हुकूम देणार? कोणत्या कायद्यात असे लिहिले आहे की राष्ट्रपतींनी तीन महिन्यांत विधेयकावर निर्णय घ्यावा? याचा अर्थ असा की तुम्ही या देशाला अराजकतेकडे घेऊन जाऊ इच्छिता.”

दरम्यान काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मंजुरीसाठी आलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी तीन महिन्यांच्या आता निर्णय घ्यावा असा निकाल एका प्रकरणात दिला होता.

एकमेकांचा आदर केला पाहिजे

तत्पूर्वी, वक्फ कायद्याविरुद्धच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वी, केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते की, “सर्वोच्च न्यायालय या कायदेशीर बाबीवर भाष्य करणार नाही असा त्यांना विश्वास आहे. कायदेमंडळ आणि न्यायपालिका यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपराष्ट्रपतींकडूनही सर्वोच्च न्यायालयावर टीका

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी काही दिवसांपूर्वी न्यायव्यवस्थेविरुद्ध कडक टीका केली. ते म्हणाले की, “आपण अशी परिस्थिती निर्माण करू शकत नाही जिथे तुम्ही भारताच्या राष्ट्रपतींना सूचना देत आहात. या सूचना कोणत्या आधारावर देत आहात? संविधानाच्या कलम १४५(३) अंतर्गत तुम्हाला फक्त कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे. कलम १४२ हे लोकशाही शक्तींविरुद्ध एक अण्वस्त्र क्षेपणास्त्र बनले आहे.