आम आदमी पक्षाच्या (आप) पंजाब शाखेत बंडखोरीचे वृत्त मुख्यमंत्री भगवंत मान यांनी फेटाळले. काँग्रेस नेत्यांना पक्ष बदलाची सवय आहे. आपचे नेते निष्ठावंत असल्याचे प्रमाणपत्र मान यांनी दिले.

आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील पक्षाच्या आमदारांची बुधवारी दिल्लीत बैठक बोलावली होती. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर या बैठकीला महत्त्व आहे. दिल्लीत आपचा पराभव झाल्यानंतर पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या स्थिरतेला धोका असल्याची चर्चा सुरू झाली. पंजाबमधील काँग्रेस नेते प्रतापसिंग बाजवा यांनी आपचे ३० आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. मान यांनी बाजवांना प्रत्युत्तर देत, दिल्लीतील पक्षाच्या आमदारांची संख्या मोजा असा टोला लगावला.

दिल्लीत सलग तिसऱ्यांदा काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. बाजवांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही. पंजाब सरकारने अनेक कल्याणकारी कामे केल्याचा दावा मान यांनी केला. अन्य राज्यांपेक्षा पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असल्याचेही त्यांनी नमूद केले. जर ही स्थिती उत्तम नसती तर, मोठे उद्याोग राज्यात का आले असते? असा सवाल मान यांनी पत्रकारांशी बोलताना केला. भाजपचे दिल्लीतील आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी केजरीवाल यांना आमदारांच्या बैठकीवरून टोला लगावला. ते पंजाबमध्ये मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहात असल्याचा आरोप सिरसा यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.