गेल्या कित्येक वर्षांपासून चीनकडून सातत्याने पूर्वेकडच्या सीमाभागात भारतीय हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. विशेषत: अरुणाचल प्रदेशमधील सीमाभागातल्या अनेक भागांवर चीननं उघडपणे दावा सांगितला आहे. दर काही महिन्यांनी चीनचे सैनिक सीमाभागातील मोठ्या दगडांवर त्यांचा अंमल असल्याचा दावा करण्यासाठी निरनिराळ्या खुणाही करत असल्याचं सांगितलं जातं. या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले असतानाच आता पुन्हा एकदा चीननं आगळीक केली आहे. अरुणाचल प्रदेशमधील तब्बल ११ ठिकाणांच्या नव्या नावांची यादीच चीननं जाहीर केली आहे. ही अशा प्रकारे चीननं जाहीर केलेली तिसरी यादी आहे!

नेमकं काय घडलं?

चीनच्या नागरी कामकाज मंत्रालयाने रविवारी यासंदर्भात अरुणाचल प्रदेशमधल्या ११ ठिकाणांची यादीच जाहीर केली आहे. यामध्ये ‘झँगनन’ असं नाव देऊन तो तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या ११ ठिकाणांमध्ये दोन खुले भूखंड, दोन निवासी भाग, पाच डोंगरावरची ठिकाणं, दोन नद्या यांचा समावेश आहे. या ठिकाणांचा उल्लेख करत त्यांच्या नव्या नावांची यादीही चीनच्या नागरी कामकाज मंत्रालयाने जारी केली आहे. यामध्ये एक ठिकाण तर थेट अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरच्या जवळचं असल्याचं निदर्शनास आलं आहे.

नावांची तिसरी यादी!

चीननं याआधी दोन वेळा अशा प्रकारची आगळीक केली आहे. याआधी २०१७ साली पहिल्यांदा चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांची नावं जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २०२१मध्ये तब्बल १५ ठिकाणांची चीनी नावं त्यांच्याकडून जारी करण्यात आली होती. अरुणाचल प्रदेशमधील भूभागावर सातत्याने आपला दावा करण्यासाठी चीनकडून हे प्रकार केले जात असल्याचं सांगितलं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताची भूमिका काय?

भारतानं नेहमीच चीनच्या अशा कृत्यांचा समाचार घेत निषेध केला आहे. “अरुणाचल प्रदेश याआधीही आणि यानंतरही भारताचा अविभाज्य भाग राहील. नवनवी नावं जाहीर केल्यामुळे हे वास्तव अजिबात बदलणार नाही”, अशी भूमिका भारतानं सातत्याने घेतली आहे.