मागील काही दिवसांत पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात चीनने दोन स्वतंत्र पूल बांधल्याच्या काही बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर आता संबंधित परिसरात चीनने दोन स्वतंत्र पूल बांधले नसून केवळ एकच विस्तृत पूल बांधल्याचं समोर आलं आहे.

‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीने अमेरिकेतील एका ‘स्पेस टेक्नॉलॉजी फर्म’कडून काही सॅटेलाइट फोटो मिळवले आहेत. त्यामध्ये पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात चीननं एक विस्तृत पूल बांधल्याचं दृष्यांमध्ये दिसत आहे. हा पूल विस्तृत असल्याने अवजड लष्करी वाहने आणि उपकरणे वाहून नेण्यास सक्षम असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेतील स्पेस टेक्नॉलॉजी फर्म ‘प्लॅनेट लॅब्स पीबीसी’ने पुरवलेल्या उच्च रिझोल्यूशन उपग्रह छायाचित्रात पुलाचं बांधकाम अद्याप सुरू असल्याचंही दिसत आहे.

हेही वाचा-

हेही वाचा- “चीनच्या ५ युद्धनौका आणि १७ लढाऊ विमानं…”, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाचा गंभीर दावा; हल्ल्यासाठी चीन सज्ज?

१५ ऑगस्ट रोजी हे फोटो संकलित करण्यात आले होते. या पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चिनी सैन्य भूदल, जड तोफखाना, मोठी वाहने आणि अवजड लष्करी उपकरणे उत्तर आणि दक्षिणेकडील किनारीपट्टी परिसरात सहजपणे हलवू शकतात. यामुळे चिनी सैन्यांना आता गलवान खोऱ्यापर्यंत यायला १२ तासांऐवजी अंदाजे चार तासांचा कालावधी लागू शकतो.

हेही वाचा- अन्वयार्थ : चीनच्या नाना तऱ्हा..

या पुलाखालून गस्त घालणाऱ्या युद्ध सामग्री सज्ज बोटींना जाण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक आहे की नाही? हे उपलब्ध फोटोंवरून अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या नवीन फोटोंमध्ये पुलाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ काही भाग मोकळा सोडल्याचं दिसून आलं आहे.