लडाखमध्ये ताबा रेषेजवळ अजुनही भारत आणि चीनचे सैन्य हे मोठ्या प्रमाणात आमनेसामने आहे. २०२० च्या जूनमधील चीनच्या कुरापतीनंतर भारताने लडाखमधील ताबा रेषेजवळ सैन्यसंख्या वाढवत चीनला प्रत्युत्तर दिले आहे .दोन्ही बाजूंनी गेल्या दोन वर्षात १२ महिने म्हणजे ऐन हिवाळ्यातही सैन्य तैनात राहील अशा पद्धतीने पावले उचलली असून पूरक अशा पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत आणि त्यात भर पडली जात आहे. लडाखच्या ताबा रेषेवर अजुनही काही भागांबाबत वाद कायम असून भारत आणि चीन दरम्यान लष्करी चर्चेची फेरी लवकरच होणार आहे.

असं असतांना चीनच्या सातत्याने ताबा रेषेवर कुरापती सुरु आहेत. आठ जूनलाही असंच पाऊल चीनने उचलेलं होतं. या दिवशी पहाटे चारच्या सुमारास चीनच्या वायू दलाचे एक लढाऊ विमानाने ताबा रेषेच्या अत्यंत जवळने उड्डाण केल्याचे वृत्त एनआयने या वृत्त संस्थेने दिले आहे. अशा वेळी प्रत्युत्तर म्हणून भारताच्या लष्कर आणि वायू दलाने उत्तर देण्यासाठी पावले उचलेली. मात्र हे लढाऊ विमान ताबा रेषा न ओलांडता चीनच्या हद्दीत कायम राहिल्याने पुढील अनर्थ टळला. वस्तुततः ताबा रेषेजवळ सैन्याची जमावाजमव केली गेली असतांना अशा पद्धतीची लढाऊ विमानाची भरारी ही चकमकीला निमंत्रण देऊ शकते. त्यामुळेच चीनच्या संबंधित लष्करी अधिकाऱ्यांकडे या घटनेबाबत जाब विचारण्यात आला आहे.

एनआयलाने दिलेल्या वृत्तानुसार हवाई संरक्षण देणाऱ्या एस-४०० या प्रणालीची चीन चाचपणी करत होता. त्यासाठी एक युद्धसराव चीनने आखला होता, त्याचाच एक भाग म्हणून चीनच्या लढाऊ विमानाने ताबा रेषेच्या अत्यंत जवळून उड्डाण केले. चीनने भारताआधीच रशियाकडून हवाई संरक्षण देणारी एस-४०० यंत्रणा दाखल केली असून आठ जूनला झालेल्या घटनेच्या निमित्ताने ही यंत्रणा पूर्व लडाखसाठी तैनात करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान भारताने याआधीच पुरेशी लष्करी आणि वायू दलाची यंत्रणा-शस्त्रास्त्रे ही लडाख परिसरासाठी तैनात केली असून भारतीय वायू दलाचा तर नियमित सराव या भागात सुरु आहे.