China On Donald Trump Brics Extra Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची मोठी चर्चा आहे. ट्रम्प प्रशासन घेत असलेल्या निर्णयाचा फटका जगभरातील अनेक देशांना बसत आहे. यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धोरणाचा अनेक देशांना फटका बसला आहे. यातच काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी धमकी देत रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या देशांवर तब्बल ५०० टक्के आयातशुल्क लादणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट ब्रिक्स राष्ट्रांना धमकीवजा इशारा दिला आहे.
जो देश ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांबरोबर जाईल, त्या देशांवर १० टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर या धोरणाला कोणताही देश अपवाद असणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. ब्रिक्समध्ये भारतही सहभागी असल्यामुळे हा इशारा भारताली लागू पडतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेवर ब्रिक्स राष्ट्र काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागलेलं असतानाच आता या संदर्भात चीनची प्रतिक्रिया समोर आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धमकीला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भूमिका मांडत स्पष्ट केलं की ब्रिक्स गट कोणताही संघर्ष करू इच्छित नाहीत, असं स्पष्ट केलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितलं की, “टॅरिफ लादण्याबाबत चीनने वारंवार आपली भूमिका मांडली आहे. तसेच राजकीय दबावाचे साधन म्हणून टॅरिफ शुल्काच्या वापराला चीनने तीव्र विरोध दर्शविला आहे. आयातशुल्काच्या अतिरिक्त वापर कोणाच्याही फायद्याचा नाही, आम्हाला संघर्ष नको आहे, त्यात काही फायदा नाही”, असं प्रवक्ते माओ निंग यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स राष्ट्रांना काय इशारा दिला?
ब्रिक्स नेत्यांनी वाढत्या अमेरिकन आयातकरांवर टीका केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रांवर अतिरिक्त कर लावण्याचा इशारा दिला. या संदर्भात ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट शेअर केली. “जो कोणता देश ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांबरोबर जाईल, त्या देशांवर १० टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादलं जाईल, तसेच या धोरणाला कोणताही देश अपवाद असणार नाही”, असं ट्रम्प यांनी म्हटलं.
इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांचा ब्रिक्सकडून निषेध
दरम्यान, ब्राझीलमध्ये झालेल्या ब्रिक्स २०२५ शिखर परिषदेत सदस्य राष्ट्रांनी इराणवरील लष्करी आणि आण्विक सुविधांवर अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला. ब्रिक्स २०२५ शिखर परिषदेत, ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका या देशांनी इराणवरील अमेरिका-इस्रायली हवाई हल्ल्यांचा निषेध करणारे संयुक्त निवेदन जारी केले.
ब्रिक्स म्हणजे काय?
ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश एकत्र येऊन ‘ब्रिक’ नावाचे एक संघटन तयार करण्यात आले. २००१ मध्ये गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक जिम ओ’नील यांनी ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचे वर्णन करण्यासाठी ब्रिक हा शब्द वापरला. या शब्दाचा स्वीकार करून पहिली ब्रिक शिखर परिषद १६ जून २००९ रोजी रशियातील येकातेरिनबर्ग येथे झाली. सर्वात वेगाने वाढणाऱ्या विकसनशील देशांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पाश्चात्य शक्तींचे वर्चस्व असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा सामना करण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली होती. २०१० मध्ये या संघटनेत दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर संघटनेला ब्रिक्स असे नाव देण्यात आले.