पीटीआय, संयुक्त राष्ट्र/जिनिव्हा : चीनने आपले ‘शून्य-कोविड’ धोरण शिथिल केल्यानंतर देशातील करोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा बीजिंगला वास्तविक संसर्ग आकडेवारी नियमितपणे प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले आहे. चिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी जनुकीय क्रमनिर्धारण, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या, दैनंदिन मृत्यू व लसीकरणाची आकडेवारीही पुरवावी अशी सूचना या संघटनेने केली आहे.

करोनाच्या प्रादुर्भावाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनला मदत पुरवण्यासाठी चीन व जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांत एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात आरोग्य संघटनेतर्फे हे आवाहन करण्यात आले. संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले, की या बैठकीत चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ्य आयोग व राष्ट्रीय रोग नियंत्रण व प्रतिबंध यंत्रणेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी आरोग्य संघटनेला महासाथीला तोंड देण्यासाठी चीनने आखलेले धोरण, कारवाईचे स्वरूप, लसीकरण, रुग्णोपचार, संवाद व संपर्क आदींबाबत आरोग्य संघटनेस माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य संघटनेने चिनी शास्त्रज्ञांना आरोग्य संघटनेच्या करोना तज्ज्ञांच्या पथकासोबत काम करण्याचे आमंत्रण दिले आहे. यात करोना रुग्णोपचार व्यवस्थापन यंत्रणेतही चीनच्या पथकाला सामावून घेण्याचा प्रस्ताव दिला आहे.