पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनची उपस्थिती असून त्यावर भारताचे बारकाईने लक्ष आहे आणि चीनने अशा प्रकारच्या कारवाया थांबवाव्या असे त्यांना सांगण्यात आले आहे, असे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या चीनच्या कारवायांवर सरकारचे लक्ष आहे, त्याबाबत भारताने चीनला कळविले असून अशा प्रकारच्या कारवाया खंडित कराव्या, असेही त्यांना सांगण्यात आल्याचे जेटली म्हणाले.
चीनच्या अधिकाऱ्यांसमवेत विविध प्रश्नांवर म्हणजेच दोन्ही देशांमधील संबंध, प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांवर नियमितपणे चर्चा सुरू आहे. चीनच्या लष्कराचे वास्तव्य या प्रश्नावरही चर्चा झाली असून तेथे त्यांच्याकडून सुरू असलेल्या बांधकामांबाबतचा प्रश्नही चर्चिला गेला आहे, असेही जेटली म्हणाले. दोन्ही देशांमध्ये मध्यंतरी झालेल्या भेटीत समन्वय आणि सलोखा यांना प्राधान्य दिले जाईल, असे ठरले आहे.